आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pawar News In Marathi, Sharad Pawar Speak In Rally At Amravati, Divya Marathi

विकासावर न बोलणार्‍या उमेदवाराला परत पाठवा, शरद पवार आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतवाडा- ‘जिल्ह्याचे खासदार सातार्‍याहून मुंबईला आले. मुंबईहून बुलडाणा व तेथून अमरावती, असा त्यांचा प्रवास आहे. लोकसभेत जिल्ह्याच्या विकासावर कधीच न बोलणार्‍या या उमेदवाराला आता त्यांच्या गावाला परत पाठवा,’ असे आवाहन कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी केले.

परतवाडा येथे आयोजित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत पवार बोलत होते. ‘सर्वच पक्षांचे खासदार दिल्लीत केंद्रीय मंत्री या नात्याने मला भेटायला आले. अडसूळही आले होते, परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी नव्हे, तर बँकेच्या कामासाठी,’ अशी टीकाही त्यांनी केली. जोगेंद्र कवाडे यांनी आपल्या भाषणात भाजपचा ‘भारतीय जल्लाद पार्टी’ असा उल्लेख करीत हा पक्ष दंगलींच्या माध्यमातून नागरिकांना मारण्याचे काम करीत असल्याचे म्हटले. अनिल देशमुख यांनी अन्न सुरक्षा योजनेची माहिती देऊन पक्ष सामान्यांशी जुळला असल्याचे सांगितले. आमदार केवलराम काळे, रवि राणा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, नवनीत राणा आदींचीही या वेळी भाषणे झालीत.

अरुण गावंडे, सुरेखा ठाकरे यांच्यात हमरीतुमरी
परेड ग्राउंड येथे प्रचारसभा सुरू होण्यापूर्वी दर्यापूर येथील राष्ट्रवादीचे नेते अरुण गावंडे व जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्यात हमरीतुमरी झाली. हा वाद पत्रक वाटण्यावरून व पवार यांची दर्यापूर येथील रद्द झालेल्या सभेवरून झडल्याची चर्चा घटनास्थळी होती.

पाण्याच्या पाउचसाठी नागरिकांचा गोंधळ
तापणारे ऊन व उष्म्यामुळे उपस्थितांच्या घशाला कोरड पडली होती. अशा स्थितीत नागरिकांसाठी पाण्याचे पाउच आणण्यात आले. पाउचसाठी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याने प्रचंड गोंधळ उडाला.

राणांनी कवाडेंऐवजी केला आठवलेंचा उल्लेख
आमदार रवि राणा यांनी व्यासपीठावर उपस्थित नेत्यांचे आभार व्यक्त करताना जोगेंद्र कवाडे यांचा ‘आठवले’ असा उल्लेख केला. चूक लक्षात आल्यानंतर रवि राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली.