आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पीडीएमसी’मधील डीनपदाचा वाद, दोन्ही दरवाजांना आता कुलूप; पाच सुरक्षारक्षक केले तैनात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या डीनपदाचा वाद दिवसेंदिवस वाढत असून, शुक्रवारी डीन कक्षाच्या दोन्ही दरवाजांना कुलूप लावण्यात आले होते. शिवाय, खबरदारीचा उपाय म्हणून कक्षाजवळ पाच सुरक्षारक्षक तैनात होते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी कामावर हजर होण्यासाठी आलेले डॉ. सोमवंशी यांना आल्यापावली परत जावे लागले.
यापूर्वी केवळ डीनच्या कक्षाला कुलूप राहायचे.
मात्र, आज त्या कक्षाबाहेर असलेल्या अन्य एका दरवाजालाही कुलूप होते; तसेच कक्षाबाहेरील सुरक्षासुद्धा वाढवण्यात आली आहे. नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाने डॉ. सोमवंशी यांना कामावर रुजू होण्याचा निर्णय दिला असला, तरी संस्थेने त्या संदर्भात कोणताही निर्णय अजून घेतला नाही. त्यामुळे डीन म्हणून डॉ. जाणेच असल्याचे संस्थेने पोलिसांकडे गुरुवारी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे डॉ. सोमवंशी आतापर्यंत तीनवेळी या कक्षाजवळ जाऊन आले. मात्र, त्या ठिकाणी कुलूप असल्यामुळे ते कक्षात बसले नाहीत.
शुक्रवारी तर एक सांगून दोन दरवाजांना कुलूप होते. इतकेच नाही, तर डीनच्या कक्षाजवळ तब्बल पाच सुरक्षारक्षक सुरक्षेसाठी तैनात होते. त्यामुळे डॉ. सोमवंशी शुक्रवारीसुद्धा आल्यापावली परत गेले. मात्र, या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती त्यांनी गाडगेनगर पोलिसांना जाऊन दिलेली आहे; तसेच शनिवारी आपण यावर काहीतरी निर्णय घेऊ, असेही त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.शुक्रवारी डॉ. सोमवंशी महाविद्यालयात गेले असता कक्षाला दोन कुलूप लावल्याने त्यांना परतावे लागले.

भाऊसाहेबांच्या पुण्यातिथीमुळे आज काहीच नाही केले

^१०एप्रिल ही शिक्षणमहर्षी पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी कोणताही प्रकार घडू नयेत म्हणून मी परत जात आहे. विद्यापीठाच्या आदेशाचे मी पालन करत आहे.
आजच्या घटनाक्रमाची माहिती गाडगेनगर पोलिसांना शनिवारी देणार आहे. या ठिकाणी मला धोका आहे म्हणून मी पोलिसांना सुरक्षा मागितली आहे. शनिवारी मी पुन्हा माझ्या कामावर येणार आहे. यानंतर पाहू काय हाेते ते. माझी भूमिका ही संयमाची आहे. डॉ.पद्माकर सोमवंशी.