अमरावती - येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील एमबीबीएस प्रथम वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांनी एका विषयात करवून घेतलेल्या गुणवाढ प्रकरणाचा चौकशी अहवाल समितीने तीन दिवसांपूर्वीच महाविद्यालयास सोपवला असून, मंगळवारी (दि. ५) तो डीनकडे सुपूर्द केला जाणार आहे. त्यामुळे या गोपनीय अहवालातील कटू सत्य याच दिवशी बाहेर येणार आहे.
एमबीबीएसच्या तीन विद्यार्थ्यांनी अॅनाटॉमी विषयात गुणवाढ केल्याची बाब मूल्यांकनादरम्यान लक्षात आल्यानंतर प्राध्यापकांनी ही बाब अधिष्ठाता डॉ. दिलीप जाणे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर डॉ. जाणे यांनी तीन सदस्यीय चौकशी समिती गठित करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या समितीने चौकशी पूर्ण करून अंतिम अहवाल महाविद्यालयास सोपवला आहे. हा गोपनीय अहवाल सध्या महाविद्यालयातील स्टुडंन्ट सेक्शनपर्यंत पोहोचला आहे . तो अद्याप अधिष्ठाता डॉ. जाणे यांच्यापर्यंत गेलेला नाही. त्यामुळे या अहवालात नेमके दडले काय, याची उत्सुकता वाढली असून, गुणवाढ प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोऱ्या उत्तरपत्रिका पोहोचवणारा कोण? :ज्या विद्यार्थ्यांवरगुणवाढ केल्याचा आरोप आहे, त्या विद्यार्थ्यांपर्यंत कोर्या उत्तरपत्रिका पोहोचल्या होत्या. परीक्षा झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी त्यावर उत्तर लिहून गुणवाढ केल्याचेही समोर आले.त्यामुळे गोपनीय उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या कशा त्या पोहचवणारा कोण, हा प्रश्न चर्चिला जात आहे. या प्रकरणात सहभागी असलेला एक व्यक्ती हा एका बड्या व्यक्तीच्या अतिशय जवळचा असल्याची चर्चा आहे.
चौकशी समितीने गुणवाढ प्रकरणाची चौकशी पूर्ण करून अहवाल महाविद्यालयास सोपवला आहे. सध्या हा अहवाल स्टुडंन्ट सेक्शनमध्ये आहे. आमच्यापर्यंत पोहोचला नाही. सोमवारी (दि. ४) सुटी असल्यामुळे मंगळवारी तो आमच्यापुढे येणार आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. डॉ.दिलीप जाणे, अधिष्ठाता, पीडीएमसी, अमरावती.