आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पीडीएमसी’मध्ये पाच विद्यार्थ्यांनी केली गुणवाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रथम वर्षाच्या पाच विद्यार्थ्यांनी गुणवाढ केली असल्याचे चौकशी समितीने दिलेल्या अहवालाच्या प्रथमदर्शनी पाहणीत डीन डॉ. जाणे यांना लक्षात आले आहे. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी चौकशी अहवालातील काही त्रुटींसंदर्भात नव्याने सखोल चौकशी करण्याचे आदेश डॉ. जाणे यांनी चौकशी समितीला दिले आहेत. सखोल चौकशी पुर्ण होताच दोषीविरुध्द नियमांप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पीडीएमसीमध्ये पंधरा दिवसांपुर्वी अनॉटॉमी (शरीररचना शास्त्र) विषयाच्या उत्तर पत्रिकांमध्ये गुणवाढ केल्याची बाब अ‍ॅनॉटॉमी विभागाच्या प्रमुख डॉ. रावलानी यांच्या लक्षात अाली हाेती. त्यामुळेच डॉ. रावलानी यांनी हा गंभीर प्रकार महाविद्यालयाचे डीन डॉ. दिलीप जाणे यांना सांगितला. या प्रकरणाची दखल घेत डॉ. जाणे यांनी त्रिसदस्यीय समिती नेमून चौकशीचे आदेश दिले होते.

या समितीमध्ये मायक्रोबॉयलॉजीचे विभागप्रमुख डॉ. पी. आर. भिसे, फारमॅकॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. एस. एस. देशपांडे आणि पॅथॉलॉजीचे सहायक प्राध्यापक डॉ. मिलींद जगताप यांचा समावेश होता. या त्रिसदस्यीय समितीने प्रकरणाची चौकशी करून चार ते पाच दिवसांपुर्वी आपला अहवाल डॉ.जाणे यांच्या सादर केला. या अहवालाची डॉ. जाणे यांनी पाहणी केली असून प्रथमदर्शनी गुणवाढ झाली असून ही पाच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये झालेली आहे. या मध्ये प्रथमदर्शनी ते पाचही विद्यार्थी दोषी आहेत. मात्र कारवाई करण्यासाठी ज्या पध्दतीने सबळ माहीती पाहीजे, त्यामध्ये काही त्रुटी आहेत. त्यामुळे या प्रकरणाची नव्याने सखोल चौकशी करून त्या त्रुटी पुर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश डॉ. जाणे यांनी दिले आहेत.

फौजदारी कारवाई नाही
गुणवाढप्रकरणात दोषी अाढळणार्‍यांविरूद्ध अधिष्ठाताच कारवाई करू शकतात. याव्यतिरिक्त या संदर्भात नाशिक आरोग्य विद्यापीठाला कळविण्यात येईल मात्र फौजदारी करण्याचा सध्या विचार नाही. त्यामुळे अंतिम चौकशी अहवालाची आम्हाला प्रतिक्षा आहे, त्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे डीन डॉ. जाणे यांनी स्पष्ट केले अाहे.

गुणवाढ ‘प्रीप्लॅन'च
एमबीबीएसच्या प्रथम सत्र परिक्षेत झालेली गुणवाढ ही िनयाेजनबद्ध पद्धतीनेच करण्यात अाली होती. असेही चौकशी अहवालात पुढे आले आहे. ज्या महाभागांनी गुणवाढ करण्याचे पाप केले त्यांनी परिक्षेच्यावेळी उत्तर पत्रिकेवर जी उत्तर लिहिलीत, त्या व्यतिरीक्त नव्याने उत्तर पत्रिकांची पाने जोडण्यात आल्याचे मुल्यांकनादरम्यान लक्षात आले होते.

पीडीएमसीमध्ये ‘अ‍ॅन्सरशीट व्हेरिफिकेशन' हा एक प्रकार आहे. आपल्याला मिळणार्‍या गुणांची विद्यार्थ्यांना स्वत: एकदा पडताळणी करता यावी, हा यामागचा महाविद्यालयाचा हेतू आहे. यामुळे पारदर्शकता राखण्यात मदत होते. त्यामुळे मुल्यांकनानंतर महाविद्यालयातच विद्यार्थ्याला काही वेळासाठी स्वत:ची उत्तरपत्रिका दिली जाते, ही उत्तरपत्रिका पाहून कुठे गुण दिलेले नाही का, एखाद्या प्रश्नाचे मुल्यांकन राहीले का? असे विद्यार्थ्यांनी पाहून प्राध्यापकांना सांगायचे असते. त्यावेळी प्राध्यापकांना हा प्रकार लक्षात आला होता. असे डॉ. जाणे यांनी सांगितले.

पुढे काय? : याप्रकरणात चौकशी समिती त्रुटींची पूर्तता करून सखोल तपास करत आहे. या तपासात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर दोष निश्चिती करून कठोर कारवाई करणार आहे. शिवाय कोणत्या कर्मचार्‍याचा यामध्ये समावेश आढळला तर त्याला थेट घरचा रस्ता दाखवण्यात येईल, असेही डीन डॉ. जाणे यांनी सांगितले.

कोणाचीही गय केली जाणार नाही
गुणवाढ प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झालेला आहे. प्रथमदर्शनी पाच विद्यार्थ्यांनी गुणवाढ करून दोष केल्याचे पुढे आले आहे. मात्र कारवाई करण्यापुर्वी सखोल चौकशी करणे महत्वाचे आहे. तसेच काही त्रुटी असल्यामुळे त्या त्रुटी पुर्ण करून तसेच सखोल चौकशी करून लवकरात लवकर अहवाल नव्याने आम्हाला देण्यात येणार आहे. या प्रकरणात महाविद्यालयातील कोणताही कर्मचारी दोषी आढळला तर त्याला थेट घरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे. डॉ.दिलीप जाणे, अधिष्ठाता.