आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेढी पूरग्रस्तांच्या नशिबी गोठ्यातील जगणं!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वलगाव येथे सात वर्षांपूर्वी पेढी नदीच्या प्रलयामुळे नदीकाठची अंदाजे पाचशे कुटुंबे बेघर होऊन रस्त्यावर आली होती. या कुटुंबीयांना घरकुलाचे आश्वासन देऊन तात्पुरते कुडाचे निवारे उभारून देण्यात आलेत. मतांचा जोगवा मागणा-या जनप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेला अद्यापही या फाटलेल्या कुटुंबांचा संसार झाकण्यासाठी कायमचे छप्पर उपलब्ध करून देणे जमले नाही.

एक जुलै 2007 रोजी रात्री दहाच्या सुमारास पेढी नदीला महापूर आला. अवघ्या काही मिनिटांताच पुराने नदीकाठी असलेली पाचशे घरे वाहून नेली. जीव वाचवून कसेबसे लोक बाहेर पडले. मात्र, संसाराचे मातेरे झाले. जवळपास 75 ते 80 कुटुंबांकडे नेसत्या वस्त्रांशिवाय काहीच शिल्लक नव्हते. एकंदर 550 कुटुंबांच्या घरांना या महाप्रलयामुळे हानी पोहोचली. त्यांपैकी 70 कुटुंबांच्या राहण्याची तात्पुरती सोय बाजारात करण्यात आली. एका कुटुंबाला 10 फूट बाय 10 फुटांची जागा देऊन त्यावर कुडाचे घर आणि टिन टाकून देण्यात आले. कायमस्वरूपी घरकुल लवकरच उभारून देण्यात येईल, या आश्वासनावर या जागेत ही कुटुंबे...
राहायला गेली. मात्र, सात वर्षांनंतरही या कुटुंबाना ना घरकुल मिळाले, ना तात्पुरत्या निवा-याची दुरुस्ती करण्यात आली. सात वर्षांपूर्वी उभारलेल्या या कुडाच्या झोपड्यांची अवस्था आज गुरांच्या गोठ्यापेक्षा वाईट झाली आहे. या नागरिकांना अद्याप हक्काचे भूखंड व घरकुल मिळालेले नाहीत. चार वर्षांपूर्वी शासनाने जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतु, त्यातील छदामही अद्याप न मिळाल्याने या निधीची पोकळ घोषणाच शिल्लक राहिली. हक्काचे घरकुल व कायम निवा-याच्या मागणीसाठी अनेक आंदोलने, उपोषणे केली. पण, नशिबी निराशाच आल्याने व्यवस्थेवरचा विश्वासच उडाल्याच्या दाहक प्रतिक्रिया पूरग्रस्तांनी व्यक्त केल्या.

सोयरिकी तुटल्या ! : पूरग्रस्तांनी उभारलेल्या कुडाच्या घरांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. जोराचा पाऊस आल्यास चारही बाजूने पाणी शिरते. अशातच विवाहेच्छुकांची समस्या बिकट झाली आहे. घर आणि वस्तीची परिस्थिती पाहूनच मुलगा किंवा मुलगी पाहण्यासाठी आलेले पाहुणे नकार देतात, असे पूरग्रस्त सांगत होते. इतकेच नव्हे तर जिवाभावाच्या नातेवाइकांनाही मुक्कामाला न राहण्याचा सल्ला नाइलाजाने द्यावा लागतो. ज्या ठिकाणी चार व्यक्ती नीट राहू शकत नाहीत, तेथे पाहुण्यांना कसे ठेवणार? जोराने पाऊस आला, तर आम्हाला रात्र जागून काढावी लागते. कारण घर सुरक्षित नाही. शासकीय यंत्रणेचे उंबरठे झिजवून आम्ही थकलो आहोत. शासनाने तातडीने घरकुल द्यावे, अन्यथा आम्हाला मरण पत्करावे लागेल, असे वास्तव अनेक पूरग्रस्तांनी मांडले.

‘सरकार’ नावावरून विश्वासच उडाला
न्याय मिळावा म्हणून पूरग्रस्तांनी यापूर्वी अनेकदा जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले. उपोषण, आंदोलने केली. मात्र, अजूनही फायदा झालेला नाही. दोन महिन्यांत काम पूर्ण होईल, असे पालकमंत्र्यांनी वर्षभरापूर्वी आश्वासन दिले होते. त्याला वर्ष लोटले आहे. त्यामुळे आता तर शासकीय यंत्रणेवर विश्वासच राहिला नसल्याचे पूरग्रस्त म्हणाले.
शासकीय अधिका-यांनी स्वत: यावे

शासकीय यंत्रणेतील अधिका-यांनी एकदा तरी या ठिकाणी यावे. आम्ही सात वर्षांपासून येथे वास्तव्यास आहोत. त्यांनी दिवसातील केवळ सात तास या ठिकाणी राहावे, म्हणजे आमच्या समस्या त्यांना कळतील. भाविका शेंडे, पेढी येथील पूरग्रस्त.

आता मुंबईत जाऊन आंदोलन
आंदोलन, मोर्चे पुष्कळ झाले. दहा-दहा रुपये गोळा करून आम्ही निवेदन देण्यासाठी अमरावतीला येतो. शेवटचा उपाय म्हणून आता मुंबईत जायचे अन् निकाल लावून परतायचे, अन्यथा यायचेच नाही.चरण डोंगरे, पेढी येथील पूरग्रस्त.