आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People In Amravati Urged To Support A Separate Vidharbha State

वेगळ्या विदर्भ राज्यासाठी मतदान झाले, निकाल आज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - वेगळ्या विदर्भ राज्यासाठी ‘विदर्भ माझा’ संघटनेतर्फे गुरुवारी घेण्यात आलेल्या मतदानाचा कौल शुक्रवारच्या मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे. शहरातील दीडशेवर केंद्रांमधून ही मोहीम राबवण्यात आली. सरासरी एक हजार याप्रमाणे सर्व केंद्रावरून अंदाजे दीड लाख नागरिकांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवला.

सकाळी आठला मतदानास प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांपासून ते आजी-माजी लोकप्रतिनिधींपर्यंतचे सर्व घटक या प्रक्रियेत सहभागी झाले होते. विदर्भाबाबतचे जनमत तपासण्यासाठी संघटनेने टप्प्याटप्प्याने मतदान घेण्याचे ठरवले आहे. अमरावती येथील उपक्रमाने या मोहीमेचा र्शीगणेशा झाला. अगदी शेवटच्या टप्प्यात नागपुरात मतदान घेऊन वेगळ्या विदर्भ राज्याला किती लोकांचा पाठिंबा आहे, हे उघड केले जाणार आहे.

मतदानासाठी शहराच्या प्रमुख चौकांसह मंदिरे, प्रार्थनास्थळे, निमशासकीय कार्यालये, सामाजिक व स्वयंसेवी संस्थांची कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा न्यायालय अशा वर्दळीच्या ठिकाणीही मतदान केंद्रे उघडण्यात आली होती. त्यामुळे स्वत:ची कामे सांभाळूनही अनेकांना या प्रक्रियेत भाग घेता आला.

मुख्य कार्यालयात आज मतमोजणी
वेगळ्या विदर्भासाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मोजणी शुक्रवारी (दि. 11) इर्विन चौकातील मुख्य कार्यालयात होणार आहे. सकाळी 10 पासून मतमोजणीला प्रारंभ होईल. समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप काळे यांच्या देखरेखीत हे कार्य पार पडणार आहे.

कशाला हवा वेगळा विदर्भ?
राजकीयदृष्ट्या ही मागणी होत असेल, तर ती संकुचित ठरेल. व्यापक हिताच्या दृष्टीने हे योग्य नाही. ग्लोबल कन्सेप्टमध्ये छोटी-छोटी राज्ये ही मागणी संयुक्तिक होणार नाही. त्यामुळे वेगळा विदर्भ कशासाठी हवा, हेच मला कळत नाही. अँड. आकाश मालू, अंबापेठ.

स्वतंत्र राज्य झाले पाहिजे
विदर्भाचे मागासलेपण दूर करायचे असेल, तर स्वतंत्र राज्य झालेच पाहिजे. त्यामुळे वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी अत्यंत वाजवी आहे. स्वतंत्र राज्य झाले, तर बर्‍याच गोष्टींना चालना मिळेल. विदर्भातील शहरं यासाठी सक्षम आहेत. अँड. मिलिंद वैष्णव, अमरावती

वेगळा विदर्भ हवाच
गेल्या अनेक वर्षांपासून आमच्यावर अन्यायच केला जातो. कोणतीही मागणी करा, ती पूर्ण होत नाही. मराठवाडा सोडून राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र चूपचाप विकासकामे केली जातात. त्यामुळे वेगळे होण्याशिवाय पर्याय नाही. हरिभाऊ रोडे, शेंदूरजनाघाट

माजी मंत्र्यांनीही घेतला सहभाग
याच केंद्रावर अकोल्याचे काँग्रेस नेते तथा माजी मंत्री असगर हुसेन यांनीही मतदान केले. ‘विदर्भ माझा’चे ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रकांत वानखडे यांच्या विचारांशी सहमत असलेले हुसेन यांनी वेगळ्या विदर्भाचा खुल्या मनाने पुरस्कार केला. त्यांच्या मते, स्वतंत्र राज्य झाल्याखेरीज या भागाचे मागासलेपण संपणार नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी हा पर्याय स्वीकारला पाहिजे.

‘राजकमल’मध्ये चांगला प्रतिसाद
शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राजकमल चौकातील मतदान केंद्रावर सर्वाधिक मतदान झाले. विद्यार्थ्यांपासून ते देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांसह आमदारांनीही याच केंद्रावर मतदान केले. नवरात्रीनिमित्त अंबादेवी रस्त्यावर यात्रा भरली आहे. देवीच्या दर्शनाला जाण्याचा मार्गही तोच आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी होती. यातील अनेकांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या दृष्टीने आपली मते नोंदवली.