आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीटकनाशकांचा खुला बाजार; अज्ञानी डॉक्टर सांगे उपचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती-किडीच्या तडाख्यात सापडलेले पीक वाचवण्यासाठी शेतकरी औषधींचा तज्ज्ञ नसलेल्या कृषी केंद्रचालकांच्या सांगण्यावरून हजारो रुपयांच्या कीटकनाशकांची झटक्यात फवारणी करून टाकतो. माणसांच्या औषधींच्या बाजारपेठेखालोखाल कोट्यवधीची उलाढाल असलेल्या शेती औषधींचे तज्ज्ञ डॉक्टर सहज उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकर्‍यांना प्रचंड आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

शहरातील विविध कीटकनाशकांच्या होलसेल विक्रेत्यांच्या मते, जिल्ह्यात दरवर्षी 300 कोटींची उलाढाल होत आहे. बियाण्यांचे विविध वाण, त्यावर येणार्‍या विविध किडी यांमुळे कीटकनाशक, तणनाशक, बुरशीनाशक आदींची बाजारपेठही प्रचंड विस्तारत आहे. माणसाला औषधी देण्यासाठी डॉक्टर सहजपणे उपलब्ध आहेत; परंतु पिकावरील होणार्‍या आजारावर उपचार करण्यासाठी उपलब्ध असणारा कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन यंत्रणा शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्यासाठी कमी पडत आहे. अशा परिस्थितीत अल्पशिक्षित व कीड रसायनशास्त्राचा कोणताही जाणकार नसलेला कृषी केंद्रचालकच पिकावरील रोगाचा डॉक्टर झाल्याचे चित्र आहे. परिणामी, जादा कमिशन मिळणार्‍या औषध उत्पादन कंपनीचे कीटकनाशक शेतकर्‍यांच्या माथी सर्रास मारली जात आहेत.

कीटकनाशकांची उलाढाल मोठी : जिल्ह्यात बियाण्यांचे परवाने असलेले 1,032, खतांचे परवानाधारक 1,107 तर कीटकनाशकांचे परवानाधारक कृषी केंद्र 1,010 आहेत; परंतु बहुतांश कृषी केंद्रांमध्ये कीटकनाशकांची विक्री करण्यात येते. अनेक केंद्रांमध्ये कंपन्या थेट औषधी पुरवतात. त्यामुळे या उलाढालीचा आकडा होलसेल डिलरकडे उपलब्ध होऊ शकत नाही. कीटकनाशकांची दरवर्षीची उलाढाल ही 300 कोटींहून कित्येक अधिक असू शकते, असे शहरातील विविध होलसेल विक्रेत्यांनी सांगितले.

कीटकनाशक, तणनाशकांचा उद्योग प्रचंड विस्तारला आहे. पिकांवर हा महागडा औषधोपचार करण्यासाठी कृषी विभागाची ‘कृषी वैद्यक’ यंत्रणा थिटी पडत असल्यामुळे एखादा दहावा वर्ग शिकलेला कृषी केंद्रचालकच या रोगांचा ‘डॉक्टर’ झाला आहे. नफेखोरीच्या या खुल्या बाजारपेठेत एकाच रोगावर जादा कमिशन मिळणार्‍या विविध महागड्या औषधी शेतकर्‍यांच्या गळी उतरवल्या जात आहेत. कीड नियंत्रणाच्या वाढलेल्या खर्चामुळे उत्पादन खर्चही वाढला आहे. परिणामी, योग्य वेळ, औषधी, मात्रा सांगण्यासाठी ‘कृषी वैद्यक’ यंत्रणेचे जाळे विस्तारण्याची गरज निर्माण झाली आहे.
246 कीटनाशके वापरण्याला परवानगी असून, 39 कीटकनाशकांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

देशातील कीटकनाशकावर नियंत्रण ठेवणार्‍या केंद्रीय कीटकनाशक बोर्डाकडे कीटकनाशक अधिनियम 1968 नुसार, एकूण 841 औषधांची नोंदणी करण्यात आली आहे.

कृषी ‘डॉक्टरांचा’ प्रताप!
अंतोरा, ब्राह्मणवाडा भगत व शिराळा येथील काही शेतकर्‍यांनी कृषी केंद्र चालकाच्या सांगण्यावरून काही दिवसांपूर्वी पिकावर फवारणी केली; परंतु चुकीच्या ‘औषधोपचारामुळे’ अनेक शेतकर्‍यांचे पीकच वाळून गेल्याने कृषी केंद्र चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले. योग्य ‘डॉक्टर’च्या मार्गदर्शनाअभावी शेतकरी मात्र भुईसपाट झाला.

कृषिसेवक कितपत तज्ज्ञ?
कृषिसेवकांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना फवारणीच्या औषधाबाबत मार्गदर्शन करण्यात येते; परंतु कृषिसेवक हे कीटकनाशकांचे जाणकार नसल्यामुळे व त्यांची ती योग्यताही नसल्यामुळे त्यांचा उपचार कितपत मानावा, असा प्रश्न शेतकर्‍यांमध्ये उपस्थित केला जात आहे.

थेट विक्रीने जोर धरला
जिल्ह्यात होलसेल विक्रेत्यांमार्फत कीटकनाशकांची होणारी उलाढाल अंदाजे 50 कोटी रुपयांच्या घरात जाते; परंतु बहुतांश कंपन्या थेट कृषी केंद्र चालकांना औषधींची थेट विक्री करीत असल्यामुळे हा आकडा सांगणे कठीण आहे. विलासराव इंगोले, अध्यक्ष, जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघ.

मेडिलकलची उलाढाल 500 कोटींची
जिल्ह्यात मेडिकलच्या माध्यमातून मानवी औषधींच्या विक्रीची उलाढाल अंदाजे 500 कोटींची आहे. संजय बोबडे, अध्यक्ष, जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन.

केंद्रीय कीटकनाशक बोर्डाकडे 841 औषधांच्या नोंदी
500 कोटी उलाढाल
1,531 मेडिकल

मेडिकल व्यवसायाची उलाढाल
300 कोटी कृषी केंद्रांची उलाढाल
1,010 कृषी केंद्र (कीटकनाशक परवाना)