आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोठलं रगताचं नातं, देते माणुसकीचा ओलावा; बंध आपुलकीचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिथं रक्ताची माणसं नाती तोडतात, तिथं आपुलकीचे बंध जपणारे, नात्यातील माणसांपेक्षाही सरस ठरतात. असंच एक नातं जपलंय विकास वर्मा या तरुणाने वयोवृद्ध राधाबाई खंडारे यांच्याशी. सुरकुतलेलं अंग, डोक्यावर पांढरे शुभ्र केस आणि अस्वच्छ वेशभूषा असलेल्या राधाबाई या शहरातील रस्त्यावर भिक्षा मागणार्‍यांपैकी एक.राधाबाईला दोन मुलं. एक भोपाळला कामाला असतो. दुसरा अमरावतीत. रक्ताची दोन नाती असूनही राधाबाई निराधाराचे जीवन जगतात. थकलेल्या अंगाने कामही होईना अन् पोटाला भूकेने पडणारी पीळ स्वस्थही बसू देईना. नाइलाजास्तव राधाबाईने लोकांपुढे हात पसरणे सुरू केले. भिक्षा मागताना जो देईल त्याचेही भले, जो देणार नाही, त्याचेही भले असे शुभचिंतन करीत राधाबाई शहरातील रस्त्यांवरून गेल्या अनेक वर्षांपासून फिरत आहेत. अशात राधाबाईंची भेट झाली विकास वर्माशी. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मेहनत करून जीवन जगणारा हा तरुण. सुरुवातीला एका बीअर बारमध्ये काम करीत असताना राधाबाई तिथे भीक्षा मागण्यासाठी येत. बस्स, इथूनच राधाबाई आणि विकासची ओळखी झाली.
बार मालकाने दिलेला रुपया, दोन रुपया विकास राधाबाईंच्या हातावर टिकवायचा. अशात बोलता बोलता विकासला राधाबाईंची परिस्थिती कळली. राधाबाईला दोन मुलं आहेत; पण तरीही त्यांचं करणारे कुणी नाही. म्हणूनच त्या लोकांपुढे हात पसरतात, हे कळल्यावर विकास अस्वस्थ झाला. त्याच दिवसापासून राधाबाई भेटल्या, की विकास त्यांचा चहा-नाश्ता करतो. गरज पडली, की त्यांना पैशांचीही मदत करतो. हा सिलसिला सुरू आहे सलग पाच वर्षांपासून. विकासचा खिसा नोटांनी भरलाय म्हणून दानातून पुण्य कमावण्यासाठी तो हे करतोय असं मुळातच नाही. उलट, आता विकासची बारमधील नोकरीही गेली आहे. रस्त्याकडेला एका पान टपरीवर तो रोजंदारीने काम करतो. त्याचेच उत्पन्न त्यालाच पुरत नाही; पण अशातही आपल्या भाकरीतून चतकोर भाकरी का होईना; तो मदतीच्या रूपाने राधाबाईंपर्यंत पोहोचवतोच. असं का, याचं उत्तर राधाबाई आणि विकास दोघांजवळही नाही; पण या दोघांकडे पाहिल्यावर एकच वाटते माणुसकीचा ओलावा आजही कायम आहे.