आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र प्रदर्शनातून घडतेय मेळघाटचे दर्शन , ‘अमरावती प्रेस फोटोग्राफर्स’चे यशस्वी आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखलदरा - मेळघाटातील निसर्ग सौंदर्य आणि आदिवासींच्या जीवनशैलीचे चित्रण करून अमरावती प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनने चिखलदरा महोत्सवात लावलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला पर्यटकांनी पहिल्याच दिवशी चांगलीच दाद दिली. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद््घाटन करण्यात आले. अमरावतीच्या प्रेस फोटोग्राफर्सचे हे चित्रप्रदर्शन राज्यपातळीवर वेगवेगळ्या जिल्ह्यांत लावण्याचे प्रयत्न करू, असे आश्वासन पोटे यांनी या वेळी दिले. आमदार सुनील देशमुख, प्रभुदास भिलावेकर, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यासह शेकडो पर्यटकांनी प्रदर्शनाला भेट दिली. मेळघाटातील संस्कृतीचे दर्शन घडवणारी शंभर छायाचित्रे प्रदर्शनात लावण्यात आली आहेत. या वेळी प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनीष जगताप, वैभव दलाल, अरुण जोशी, समीर अहमद, खोजयेमा खुर्रम, समीर अहमद, शशांक नागरे, राजकुमार मनोजा, अमोल देशमुख उपस्थित होते.

महोत्सवाचा रविवारी समारोप
महोत्सवाच्यापहिल्याच दिवशी रांगोळी रेखाटन स्पर्धा घेण्यात आली. प्रारंभी सकाळीच निवासी अंध विद्यालय आणि दीपशिखा गुरुकुल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीमचे खेळ सादर केले, तर प्रसिद्ध पतंगविक्रेते जावेद महंमद यांनी मोठमोठ्या पतंग तयार करून पतंगोत्सोव सादर केला. या वेळी आदिवासी नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. अमरावती प्रेस फोटोग्राफर असोसिएशनने मेळघाटातील चित्रण करून काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन महोत्सवात लावण्यात आले आहेत. विविध कलादालनांचे उद््घाटन या वेळी करण्यात आले. दुपारी पॅरासेलिंग, व्हॅलिक्रॉसिंग, रॉकक्लायंबिंग, हॉट एअर बलून इत्यादी साहसी उपक्रम सुरू करण्यात आले. पुढील तीन दिवस हे साहसी क्रीडा प्रकार चिखलदरा येथे सुरू राहणार आहेत. हत्ती, घोडा, उंट सफारी असणार आहे. खंजिरी भजन स्पर्धा, मशाल महोत्सव, विदर्भ संध्या हे कार्यक्रम घेण्यात आले.

शनिवारी (दि. २४ जानेवारी) दिवसभर लोक नृत्य स्पर्धा, विविध साहसी उपक्रम, खंजिरी भजन स्पर्धा, कला पथक, हास्य कविसंमेलन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील आणि खासदार आनंदराव अडसूळ यांच्या उपस्थितीत २५ जानेवारी रोजी चिखलदरा महोत्सवाचा समारोप होणार आहे. या दिवशी मेळघाट मॅरेथॉन स्पर्धा संध्याकाळी लावणीचा कार्यक्रम होणार आहे.
अॅडव्हेंचर स्पोर्ट्स बाइक लक्षवेधी
चिखलदरायेथील महोत्सवात अॅडव्हेंचर स्पोर्ट्स बाइकने पर्यटकांचे लक्ष वेधले होते. चिखलदरासारख्या पहाडी भागात अशा प्रकारच्या बाइकने प्रवास करता येतो. खडकाळ भागातून डोंगरदऱ्यामध्ये साहसी क्रीडा प्रकारात या बाइकचा समावेश होतो. सुमारे सात ते आठ लाख रुपये एवढी या बाइकची किंमत आहे. मोठमोठी चाकं आणि भलेमोठे इंजिन खास वैशिष्ट्य आहे