आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निशांतच्या खेळीने पिंकला तारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सामनावीर निशांत रुईकरच्या झंझावाती ७५ धावांच्या अर्ध शतकी खेळीच्या बळावर एचव्हीपीएम पिंक संघाने मान्सून लीग क्रिकेटच्या अकराव्या सामन्यात यलो संघाचा ११ धावांनी पराभव करून जेतेपदाची दावेदारी पक्की केली.
एचव्हीपीएम क्रिकेट क्लब आणि जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने टर्फ विकेटवर सुरू असलेल्या या लीगच्या अकराव्या लढतीत पिंक संघाने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजीचा निर्णय घेत निर्धारित ३० षटकांत सात फलंदाज गमावून १७५, अशी मजबूत धावसंख्या उभारली. हुकमी फलंदाज निशांत रुईकरने धडाकेबाज फलंदाजीच्या आधारे सर्वाधिक ७५ धावांची आक्रमक दणकेबाज खेळी केली. जयेश बत्राने २२ धावा ठोकून त्याला सुरेख सहकार्य केले.

यलो संघाचा अष्टपैलू क्रिकेटर वेदांत जाजूने धारदार माऱ्याद्वारे २१ धावांत तीन फलंदाजांना परतीची वाट दाखवली. त्याच्या अन्य सहकारी गोलंदाजांनी अथक प्रयत्न केल्यानंतरही त्यांना धावांवर अंकुश अन् बळी मिळवता आले नाहीत. प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या एचव्हीपीएम यलो संघाने विजयी लक्ष्य गाठण्याचा पूर्ण प्रयत्न करताना निकराची झुंज दिली. मात्र, त्यांच्या हातून थोडक्यात विजय निसटला. यलो संघ २३ षटकांत १६४ धावांत गारद झाला. परिणामी, त्यांना ११ धावांनी पराभव पत्करावा लागला.
अष्टपैलू वेदांत जाजूने या सामन्यात सर्वाधिक ८४ धावा ठोकल्या. यात आठ चौकार आणि एका उत्तुंग षटकाराचा समावेश होता. त्याने गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही एकाकी झुंज देत संघाला विजयाच्या निकट आणले. परंतु, दुर्दैवाने मोठा फटका हाणण्याच्या नादात तो बाद झाला अन् येथेच सामन्याने कलाटणी घेतली. या संधीला वाया जाऊ देता पिंकच्या गोलंदाजांनी उर्वरित यलो संघांच्या फलंदाजांना बांधून ठेवत संघाला यश मिळवून दिले. यलो संघातील मिथिलेश कलंत्रीने १७ धावांचे योगदान दिले. पिंक संघाचा मध्यम गती गोलंदाज आदित्य िद्ववेदीने २८ धावांत चार फलंदाज बाद केले. प्रिश वानखडेने ३० धावांत दोन, तर अमन दानखडेने २० धावांत एक फलंदाज बाद केला.

रविवारीदोन उपांत्य सामने
मान्सूनलीगचा मोसम आता अंतिम चरणात असून रविवार जुलै रोजी एचव्हीपीएम स्टेडियमवर सकाळी वाजता पहिला, तर त्यानंतर दुसरा उपांत्य सामना खेळला जाणार असल्याची माहिती स्पर्धेचे समन्वयक महेश बुंधाडे यांनी दिली. पाऊस आल्यास सामने पुढे ढकलावे लागतील. पुढील सुटीच्या दिवशी ते घेतले जाणार असल्याचे आयाेजकांनी स्पष्ट केले आहे.

फलंदाजांनी गाजवले वर्चस्व
पिंकचाफलंदाज निशांत रुईकरने या लढतीत ७५ धावांची चिवट खेळी करून संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. त्याने एक बाजू सांभाळून संघाची धावसंख्या दर्जेदार धाव सरासरीसह वेगाने वाढवली. दुसरीकडे यलो संघातील अष्टपैलू वेदांत जाजूने तर एकट्यानेच ८५ धावा तडकावल्या. मात्र, मोठा फटका खेळण्याचा मोह ऐनवेळी त्याला आवरता आला नाही. संयमाच्या अभावामुळे त्याच्या संघाचे नुकसान झाले. अकराव्या सामान्यात पिंकच्या खेळाडूंनी दमदार खेळी करून यलो संघावर मात केली.