आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 लाखांच्या वाटमारीत तक्रारदारासह दोन अटकेत, अलीकडच्या काळातील पहिलाच प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सात दिवसांपूर्वी परतवाडा ठाण्याच्या हद्दीत एका कारला अडवून त्यामधील दोघांना बांधून ठेवले आणि त्यांच्याकडील ४० लाख रुपये लुटल्याची संशयास्पद तक्रार पोलिसांत दाखल झाली होती. सात दिवसांच्या दीर्घ तपासानंतर पोलिसांनी तक्रारदार संजय शर्मा कारमध्ये त्याच्यासोबत असलेल्या नीरज अवस्थीला बुधवारी अटक केली आहे. या दोघांनाही 16 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. अशा प्रकरणात तक्ररदारालाच अटक करण्याची ही जिल्ह्यात अलीकडच्या काळातील पहिलीच घटना आहे.
संजय शर्मा चालक असलेल्या वाहनाला अडवून ही रक्कम लुटल्याचे तक्रारीत नमूद आहे. ४० लाखांची रक्कम लूटून गेल्याचे ऐकल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला. मात्र, तक्रारदाराकडून सातत्याने मिळत असलेली वेगवेगळी माहिती पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस, परतवाडा पोलिस यासोबत अचलपूर एसडीपीओ आणि पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू स्वत: या प्रकरणाचा मागील सहा दिवसांपासून तपास करत होते. तक्रार प्राप्त झाल्यापासूनच कारचालक या प्रकरणाचा तक्रारदार संजय शर्मा (३८, रा. सेंधवा, मध्य प्रदेश) आणि त्याचा सहकारी नीरज वेदभास्कर अवस्थी (२५ रा. कानपूर, उत्तर प्रदेश) यांच्यावर पोलिसांचा संशय होता. कारण संजयकडून पोलिसांना मिळणारी माहिती ही ‘कनफ्युज’ करणारी आणि तपास भरकटवणारी होती. शिवाय प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ‘कथा’ तो पोलिसांना सांगत होता. या संपूर्ण घटनाक्रमामुळे पोलिस संभ्रमात पडले होते. शिवाय संबंधित रोकडबाबत पोलिसांनी कापूस व्यावसायिकाला कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र, बुधवारपर्यंत तेसुद्धा कापूस व्यावसायिक सादर करू शकला नाही. एकंदरीत अशा सर्व प्रकारामुळे पोलिस अखेर निष्कर्षावर पोहोचले बुधवारी संजय नीरज यांना अटक करून न्यायालयापुढे हजर केले. या वेळी न्यायालयाने दोघांनाही १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
तक्रारीत नमूद आहे, की लुटमारीची घटना ९.४५ ते १० वाजताच्या सुमारास घडली आहे. वाटमारी करणा-यांनी आम्हाला पंधरा ते वीस मिनिटे बांधून ठेवले. त्यांनी आमचे मोबाइल जबरीने पळवले होते, असेही संजय शर्माने सांगितले होते. मात्र, संजय शर्माच्या मोबाइलवर १० वाजून मिनिटाने एक कॉल आला, त्या कॉलवर मिनिटाचे संभाषण झाले असून, ते मध्य प्रदेशातील सोनी नामक व्यक्तीने केले आहे. त्यावेळी शर्मा हा स्वत:च मोबाइलवर बोलल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.
रक्कम नेमकी किती होती कोणाकडून घेतली, हेसुद्धा अद्याप पुढे आले नाही. शिवाय रकमेबाबत कोणतीही कागदपत्रे पोलिसांकडे अद्याप सादर झालेले नाहीत. यासाठी पोलिस मध्य प्रदेशात जाऊन आले आहेत.
तक्रारदाराने सांगितले होते, की लूट करताना आम्हाला रिव्हॉल्व्हर दाखवले. रिव्हॉल्व्हर दाखवणारे आरोपी बॅन्डेजने हात बांधत नाहीत. अशा संशयास्पद घटनाक्रमामुळे पोलिसांनी बुधवारी दोघांनाही अटक केली आहे.

दोघांनाही अटक केली
संजय शर्मा नीरज अवस्थी यांची मागील सात दिवसांपासून आम्ही चौकशी करत होतो. यांनी सातत्याने संभ्रमात टाकणारी माहिती दिली. त्यामुळे ही रक्कम होती का? असेल तर किती, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे बुधवारी दोघांनाही अटक केली आहे. त्यांना पोलिस कोठडी मिळाली आहे. गिरीशबोबडे, ठाणेदार, परतवाडा.