अमरावती- गणेशोत्सवामध्येअनेक सार्वजनिक मंडळे विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल-ताशे, झांजचा वापर करतात. मात्र, अलीकडच्या कालात डीजे संस्कृती वाढल्यामुळे ढोल-ताशे मागे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर पारंपरिक कलेचा वारसा जोपासण्यासाठी पोलिसांनी यंदा ढोल-ताशे, झांज या वाद्यांच्या अभिनव स्पर्धेचे सात सप्टेंबरला आयोजन केले आहे.
बडनेरा पोलिस ठाणे परिसरातील मैदानावर हे आयोजन करण्यात आले असून शहर, जिल्ह्यासोबतच बाहेरील पथकही सादरीकरण करणार आहेत. या पारंपरिक वाद्यांचे स्वर फक्त गणेशोत्सवातच कानावर पडत आहेत. डीजेचे प्रमाण वाढल्यामुळे ही वाद्ये मागे पडणार काय, अशी चिंता पारंपरिक कलावंतांना सतावत आहे. त्यामुळेच कला सादरीकरणाची संधी पारंपरिक कलावंतांनाही प्राप्त व्हावी, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी पुढाकार घेतला आहे. स्पर्धेमध्ये जवळपास तीन संघ सहभागी होणार असून, त्यामध्ये १५ झांज वाजवणारे तर पंधरा संघ ताशे ढोल वाजवणारे असणार आहेत. विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच, सहभागी प्रत्येक संघाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेमध्ये दोन गट राहणार असून, एक गट गट झांज वाजवणाऱ्या संघाचा तर दुसरा ढोल वाजवणाऱ्यांचा असणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम विजेत्या संघाला सात हजार, द्वितीय पाच हजार आणि तृतीय संघाला तीन हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक पवन भंगारदिवे, पोलिस आयुक्त कार्यालय यांच्याशी संपर्क करावा.
स्पर्धेमागचा उद्देश काय? : पोलिसांनीनुकतीच सद्भावना व्हॉलिबॉल स्पर्धा घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर ही अभिनव स्पर्धा घेण्यात येत आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये वाद्यवृंदाची जबाबदारी महत्त्वाची असते. या स्पर्धेच्या माध्यमातून अधिकाधिक वाद्यवृंद पथकंासोबत पोलिसांचा थेट संवाद होणार आहे. त्यामुळे मिरवणुकांमध्ये अधिक सुसूत्रता येईल.