आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक नागरिकांची तक्रार घ्या; गुन्हे बर्किंग करू नका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकांची तक्रार संबधित पोलिसांनी दाखल करून घेतलीच पाहिजे. दाखल गुन्ह्यांची संख्या वाढली तरी चालेल, त्याची चिंता करायची नाही मात्र गुन्हे बर्किंग व्हायला नकोत, असा आदेश नवनियुक्त पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी पहिल्याच दिवशी शहर पोलिसांना दिला आहे. काम करताना आपली अशीच भूमिका राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सोमवारी (दि. ८) सायंकाळी व्हटकर यांनी उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्याकडून पदाची सूत्र स्विकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
१९९८ च्या तुकडीचे आयपीएस असलेले व्हटकर मागील तीन वर्ष सिबीआयला कार्यरत होते. तत्पुर्वी तीन वर्ष पुणे उपायुक्त, मुंबई उपायुक्त अशा शहरांमध्ये काम केले आहे. त्यामुळे शहरात पोलिसींग करण्याचा दांडगा अनुभव आपल्याकडे आहे. तो अनुभव अमरावतीला काम करताना नक्कीच उपयोगी येणार असल्याचे पोलिस आयुक्त व्हटकर यांनी सांगितले. चांगल्यात चांगली पोलिसींग देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आपला सदैव प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची साथ आवश्यक असल्याचे सांगितले.
गुन्ह्यांची संख्या वाढली की वरिष्ठ जाब विचारतील, या धास्तीने गुन्हे बर्किंग होण्याची शक्यता असते. नागरिक ठाण्यात आल्यानंतर त्याची तक्रार दाखल करून घ्याच, असा आग्रहाचा आदेश त्यांनी पहिल्याच दिवशी सर्व पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना दिला आहे. तसे आदेश आपण पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आयुक्त म्हणून पूर्ण वेळ सेवा
पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांचे कुटूंबीय हे मुंबईलाच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमरावतीत आपण एकटेच राहणार असल्याने पूर्णवेळ पोलिस आयुक्तच राहणार आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देणार असल्याचे व्हटकर यांनी सांगितले.