अमरावती - पोलिसआयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार गुंड सर्रास शहरात वावरताना दिसून येतात. त्यामुळे प्रत्येक तडीपारावर लक्ष ठेवण्यासाठी एका पोलिस कर्मचाऱ्याची निवड करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी गुरुवारी हा निर्णय घेतला.
आयुक्तालयाच्या हद्दीतून यावर्षी आतापर्यंत ६२ जणांना तडीपार करण्यात आले आहे. मात्र, तडीपारीनंतरही हे गुंड शहरात वावरतात, असे वरिष्ठ पोलिसांच्या लक्षात आले आहे. तडीपार शहरात दिसल्यास पोलिस त्याला पकडून त्याच्याविरुद्ध कलम १४२ मुंबई पोलिस कायद्यानुसार कारवाई करतात. मात्र, हा प्रभावी उपाय नाही. त्यामुळे यापुढील काळात त्यांच्यावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी पोलिस नेमण्यात येणार आहेत. हे पोलिस लक्ष ठेवून पोलिस आयुक्तालयास हालचालींविषयी इत्थंभूत माहिती देणार आहेत. तडीपार कालावधीत त्याने काही उपद्रव केल्यास संबंधित पोलिसास जबाबदार धरण्यात येणार असून, त्याच्याविरुद्ध कारवाईची तरतूदही आयुक्तांनी केली आहे. तसेच, त्या कर्मचाऱ्याने उत्तम कामगिरी बजावल्यास त्याला रिवॉर्ड देऊन गौरवण्यात येणार आहे.
तडीपारांचे वास्तव्य शहरात असायला नको म्हणून पोलिस आयुक्त डॉ.. सुरेश मेकला यांनी हा निर्णय घेतला आहे. प्रत्येक तडीपारामागे एक स्वतंत्र पोलिस निवडून त्याला तडीपारावर लक्ष द्यावे लागणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे. गणेशअणे, जनसंपर्कअधिकारी, पोलिस आयुक्तालय.