आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या वडिलांनीच दिली तिच्या मित्राच्या हत्येची सुपारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेनोडा शहीद - बेनोडानजीक पळसोना शिवारात पंधरा दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या 32 वर्षीय युवकाच्या मृत्यूचे गूढ उलगडले आहे. प्रेमप्रकरणातून मुलीच्या वडिलांनीच दोन लाखांची सुपारी देऊन हत्या केल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि. 7) या हत्याप्रकरणी त्याच्यासह तिघांना अटक केली.
नवीन सुरेश कसाने (32 रा. पळसोना) या युवकाचा किरण लोही यांच्या शेतात मृतदेह आढळला होता. मृतकाच्या वडिलांनी संशय व्यक्त केल्याने नवीनच्या मैत्रिणीचे वडील हनुमानसिंह गुर्जर याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, हत्या कोणी केली, हे स्पष्ट झाले नव्हते. प्रकरण गुंतागुतीचे असल्यामुळे पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. स्थानिक गुन्हे शाखेने गुर्जर यांची कसून चौकशी केली. हत्या करणारा दुसराच असल्याचे गुप्त माहितीवरून पोलिसांना समजले. त्यांनी बेनोडा येथील रोशन गुलाब मगरे (25) याचा शोध सुरू केला. तो चांदूरबाजारला गवसला. येथीलच अरुण ओंकार बांबल (32), हनुमानसिंह गुर्जर यांनाही या प्रकरणात पोलिसांनी अटक केली.
रोशनने दोन लाखांत घेतली ‘सुपारी’ : नवीनची हनुमानसिंह गुर्जर याच्या मुलीसोबत मैत्री होती. घरून विरोध असल्याने तीन वर्षांपूर्वी ती मुलगी आणि नवीन पळून गेले होते. ते तीन महिने मुंबईत राहिले. त्यानंतर ते पळसोना गावात परतले. पुढील सहा महिने नवीन आणि युवती सोबतच राहिले. त्यानंतर युवती वडिलाकडे परत आली. या दरम्यान त्यांचे लग्न झाल्याचे काहींनी पोलिसांना सांगितले. मात्र, तसे कोणतेही कायदेशीर पुरावे पोलिसांना सापडले नाहीत. मुलीच्या वडिलांनी तिचे अन्य युवकाशी लग्न लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, नवीनला हे मान्य नव्हते. त्याने अनेकदा मुलीच्या वडिलांना विरोध केला होता. यातूनच त्याला संपवण्याचा कट हनुमानसिंह गुर्जर याने आखला. अरुण बांबल याच्या माध्यमातून रोशन मगरेची त्याने भेट झाली. दोन लाखांचा व्यवहार ठरला. 25 नोव्हेंबरला रोशनने नवीनला गाठले आणि दोघांनी दारू प्राशन केली. त्यानंतर शेतात नेऊन रोशनने त्याच्यावर शस्त्राने हल्ला केला. पंधरा दिवसांत हे प्रकरण उघडकीस आणल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक किरण वानखडे यांनी दिली. पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू तसेच अप्पर पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक किरण वानखडे, मुकेश गावंडे, नीलेश सुरडकर, सहायक उपनिरीक्षक गणेश मांडवकर, अरुण मेटे, मूलचंद भांबूरकर, त्र्यंबक मनोहरे, सचिन मिर्शा, शकील चव्हाण, दिनेश राठोड तसेच बेनोडा ठाण्याचे सहायक निरीक्षक बी. पी. घुगे व त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला.