आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोळा वर्षांनंतर एकाच वेळी तीन पोलिस उपायुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यापासून अमरावतीत मंजूर असलेल्या पोलिस अधिकार्‍यांच्या पदांची कायम कमतरता असल्याचाच अनुभव आयुक्तालयाने घेतला आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये दोन नवे पोलिस उपायुक्त मिळाल्याने आता तब्बल सोळा वर्षांनंतर पोलिस आयुक्तालयातील उपायुक्तपदाचा अनुशेष भरला आहे. शहरासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेले तीन उपायुक्त एकाच वेळी हजर राहण्याचा कार्यकाळही आता जून 2014 पर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिस खात्यात अधिकार्‍यांची कायम कमतरता असलेले राज्यातील अमरावती पोलिस आयुक्तालय हे एकमेव आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो. शहरात तीन पोलिस उपायुक्त आणि सात सहायक पोलिस आयुक्तांची पदे मंजूर आहेत. यापैकी एस. एस. घार्गे आणि बी. के. गावराणे हे दोन नवे पोलिस उपायुक्त आणि गंगाराम साखरकर हे सहायक पोलिस आयुक्त नव्या बदल्यांमध्ये अमरावतीला मिळाले आहेत.
सुरेश साखरे सेवानिवृत्त झाल्यानंतर मागील पाच महिन्यांपासून संजीव लाटकर या एकमेक पोलिस उपायुक्तांवर दोन्ही झोन आणि मुख्यालयाचा कारभार आहे. जून 2014 मध्ये लाटकर यांनाही एकाच ठिकाणी तीन वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांची बदली होणार, हे स्पष्ट आहे. त्यानंतर मात्र नवे आलेले दोन उपायुक्त शहरात असतील. आयुक्तालयाच्या स्थापनेपासून (जुलै 1998) मंजूर तीन उपायुक्त पदांवर एकाच वेळी तीन अधिकारी राहण्याचा प्रसंग 2011 मध्ये काही दिवसांसाठीच अनुभवाला आला होता. त्या वेळी प्रभाकर बुधवंत, अविनाश बारगळ आणि सुरेश साखरे हे तीन पोलिस उपायुक्त एकाच वेळी ड्युटीवर होते. मात्र, लगेचच काही दिवसांत बुधवंत यांची बदली झाली आणि त्या पाठोपाठ बारगळ ग्रामीणला स्थानांतरित झाले.
सहायक पोलिस आयुक्तांची तीन पदे रिक्त
सध्या अमरावतीत श्वेता खेडकर, शशिकांत भंडलकर आणि लतीफ तडवी हे तीन सहायक पोलिस आयुक्त आहेत. उर्वरित चार पदांचा प्रभार पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांवर आहे. गंगाराम साखरकर हे अमरावतीला रुजू झाल्यानंतरही सहायक पोलिस आयुक्तांची तीन पदे रिक्तच राहणार आहेत. त्यातच श्वेता खेडकर यांची पदोन्नतीवर बुलडाणा येथे अप्पर पोलिस अधीक्षक पदावर बुधवारी बदली झाली. त्यामुळे सहायक पोलिस आयुक्त पदांवरही अधिकारी नसल्याचा प्रसंग पुन्हा अमरावतीवर आला आहे.