आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेसाठी ठाणेदार उतरणार रस्त्यांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, असामाजिक तत्त्वांवर निर्बंध यावेत, ठाणेदारांचा जनतेशी संपर्क वाढावा आणि जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना वाढीस लागावी, हे उद्देश डोळ्यांपुढे ठेवून सायंकाळी सात ते आठ या वेळेत रस्त्यांवर पोलिस पायदळ गस्त घालणार आहेत.

पोलिस आयुक्तालयातील सर्व सहायक आयुक्त, ठाणेदारांना दररोज वर्दळीच्या वेळी आपआपल्या हद्दीत गस्त घालण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. मेकला यांनी दिले आहेत. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी चार्ली पथकाच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये
सध्या गस्त घातली जाते. मात्र, मागील काही दिवसांमध्ये गुन्हे आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने आता वर्दळीच्या ठिकाणी पोलिस पायी गस्त घालताना दिसणार आहेत. ठाणेदार आणि परिसरातील नागरिकांमध्ये संवाद वाढावा, यासाठी हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी स्पष्ट केले आहे.

सुरक्षित रस्त्यांसाठी विशेष मोहीम
ठाणेदारांसोबतच सहायक आयुक्तदेखील दररोज एका ठाण्याच्या हद्दीत फिरताना दिसतील. यासोबतच वाहतूक सुरक्षिततेसाठीही बुधवारपासून विशेष मोहीम हाती घेण्यात येईल. या दरम्यान रस्त्यांवर व्यवसाय थाटून वाहतुकीस अडथळा ठरणा-या अनधिकृत व्यावसायिकांवरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तालयातील जनसंपर्क अधिकारी पोलिस निरीक्षक गणेश अणे यांनी दिली आहे.
नागरिक-पोलिस यांच्यातील संवाद वाढेल
- या उपक्रमामुळे नागरिक विशेष करून ठाणेदार आणि नागरिकांमधील संवाद वाढेल. नागरिकांच्या समस्या पोलिसांना समजतील आणि कारवाई करणे सोपे जाईल, यासाठीचा हा उपक्रम आहे. सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त.