आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राज’गर्जनेची अमरावतीतही धडकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टोलनाक्यांविरोधात राज्यभर आंदोलन छेडले असताना रविवारी (दि. 9) त्यांच्या पुणे येथील सभेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. अमरावतीत कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मनसेने टोलनाक्यांविरोधात उग्र आंदोलन उभे केले असून, कल्याण व काही भागात आंदोलन चांगलेच चिघळले होते. राज ठाकरे यांनी ‘खाऊ ’ देणार असल्याचे सूचक वक्तव्य केल्याने प्रशासन खबरदारी घेत आहे.
अमरावतीत मागील दहा दिवसांपासून टोलनाक्यांवर बंदोबस्त कायम आहे. रविवारी सांयकाळी त्यात आणखी वाढ करण्यात आली; तसेच महत्त्वाच्या ठिकाणी ‘फि क्स पॉइंट’ लावण्यात आले आहेत. सायंकाळी सहापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत टोलनाक्यांसह महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्ताचे आदेश पोलिसांना प्राप्त झाले आहेत. पोलिस अधिकार्‍यांना सायंकाळी सहा वाजतापासून आपापल्या ठाण्यांच्या हद्दीत गस्त घालावी लागणार आहे. तसे आदेश प्रभारी पोलिस आयुक्त संजय लाटकर यांनी दिले आहेत. कोणत्याही टोलनाक्यावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस विभागाकडून ही काळजी घेण्यात आली आहे.
महासंचालकांचे आदेश
राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात महत्त्वाच्या ठिकाणी आणि नांदगावपेठ टोलनाक्यावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी सहा ते 12 या काळात बंदोबस्त असून, शहरात गस्त ठेवण्यात आली आहे. पोलिस महासंचालकांचे तसे आदेश आहेत. संजय लाटकर, प्रभारी पोलिस आयुक्त