आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, If Ordered I Will Give Resign Surekha Thakre, Divya Marathi News

पक्षादेश आल्यास राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना-भाजपच्या सहकार्याने आलेली सत्ता सोडण्याचे आदेश पक्षाने दिले, तर पदाचा राजीनामा देईल, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत स्पष्ट केली आहे.
जिल्हा परिषदेत युतीच्या सहकार्याने अध्यक्षपद मिळवले आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने दिलेल्या उमेदवाराचे सर्मथन करावे लागत असल्याने, मागील अनेक दिवसांपासून सुरेखा ठाकरे यांनी दुटप्पी भूमिका स्वीकारल्याचा आरोप विरोधकांनी चालवला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी पत्रपरिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. या पत्रपरिषदेला राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य संगीता ठाकरे, माजी उपमहापौर मेघा हरणे, नीलिमा महल्ले, कल्पना बुरंगे, सुषमा बर्वे आणि सपना ठाकूर या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी कोण्याही एका पक्षाचा आपण पाठिंबा घेतलेला नाही. शिवसेना-भाजपसह प्रहार आणि अपक्षांच्या बळावर अध्यक्ष झाले आहे. त्यामुळे आपण अध्यक्ष होण्यामागे कोणताही एक पक्ष दावा करीत असेल, तर ते चुकीचे आहे. मला कोणत्याही एका व्यक्तीने किंवा एका पक्षाने अध्यक्ष बनवले नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीत सहकारी असलेल्या काँग्रेसव्यतिरिक्त अन्य पक्षांशी असलेली युती तोडण्याची भाषा काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी करीत आहेत. याबाबत ठाकरे यांना विचारले असता, त्यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले.
दरम्यान, यासंबंधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, राज्यात ज्या ठिकाणी शिवसेना-भाजपच्या मदतीने सत्ता हस्तगत केली आहे, त्या ठिकाणी सत्ता सोडण्याचा निर्णय कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या बैठकीत झाला असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ
आघाडीतील सरकारमधील कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थेत अशा प्रकारे शिवसेना-भाजपशी हातमिळवणी करून हस्तगत केलेली सत्ता सोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय घेऊन अशा युती तोडू आणि सत्तेतून बाहेर पडू. भास्कर जाधव, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी.
शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर आरोप करणारे एक प्रसिद्धी पत्रक सुरेखा ठाकरे यांच्या पत्रपरिषदेत पत्रकारांना देण्यात आले. पत्रकामध्ये करण्यात आलेले आरोप ठाकरे यांनी केल्याचे नमूद होते. मात्र, त्यावर कुणाचीही स्वाक्षरी नव्हती. त्यामुळे उपस्थित पत्रकारांनी ठाक रे यांना स्वाक्षरी करण्याची विनंती केली असता, त्यांनी स्वाक्षरी करणे टाळले.