अमरावती- नवनीत राणा-कौर यांना उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू झालेल्या धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर खोडके काय भूमिका घेतात, याची उत्सुकता ताणली गेली असताना त्यांनी संयमी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेऊन तलवार म्यान केली. रविवारी सायंकळी पक्ष कार्यकर्त्यांशी बैठक आटोपून संजय खोडके सायंकाळी मुंबईसाठी रवाना झाले. सोमवारी सकाळी 10 वाजता मुंबईच्या पक्ष कार्यालयात बैठक असून, पक्षाध्यक्ष स्वत: शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याशी चर्चेअंती काही फेरबदलांची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रविवारी (2 मार्च) सायंकाळी अमरावतीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक झाली. ग्रामीण व शहरी भागातील पदाधिकारी-कार्यकर्ते मोठय़ा संख्येने या बैठकीला उपस्थित होते. नवनीत कौर-राणा यांचे नाव न घेता लोकसभेसाठी ज्यांना उमेदवारी दिली, त्याबद्दलची नापसंती त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केली. मात्र, कार्यकर्त्यांच्या भावनांशी सहमती दर्शवतानाच कोणताही अप्रिय निर्णय न घेता त्यांनी सबुरीचा सल्ला दिला. कार्यकर्त्यांचा जसा त्यांच्यावर विश्वास आहे, माझाही पक्षनेतृत्वावर विश्वास असल्याचे त्यांना कार्यकर्त्यांना सांगितले. कार्यकर्त्यांची भूमिका पक्ष नेतृत्वाजवळ मांडण्याचे आश्वासनही त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिले. बैठकीत शेवटी ते म्हणाले, आपणच मोठे केलेले झाड (पक्ष) मुळासकट का कापावे, हा खरा प्रश्न आहे. झाडाची एखादी फांदी खराब असू शकते. ती कापून फेकणे हा त्यावरील उपाय आहे, असा सूचक सल्लाही त्यांनी बैठकीस उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. स्थापनेपासून राष्ट्रवादीचे खंदे शिलेदार असलेले संजय खोडके यांनी सुरुवातीच्या काळातील काही किस्से सांगतानाच सुलभा खोडके यांना उमेदवारी देण्यासाठी बडनेरा मतदारसंघ काँग्रेसच्या कोट्यातून कसा हिसकावून घ्यावा लागला होता, हेही स्पष्ट केले. या वेळी महिला राकाँ जिल्हाध्यक्ष रिना नंदा, सरलाताई इंगळे, ग्रामीण महिला राकाँच्या जिल्हाध्यक्ष, संजय शिंदे, माजी नगरसेवक प्रा. संजय शिरभाते, भातकुली तालुक्याचे पदाधिकारी डॉ. बोहरा, अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी परतवाड्याचे सल्लूभाई आदींनीही आपले विचार मांडले.
बैठकीला पक्षाचे शहराध्यक्ष अँड. किशोर शेळके, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश मार्डीकर व चेतन पवार, प्रा. संजय आसोले, अभिमान गवई, नगरसेवक प्रा. प्रशांत डवरे, माजी नगरसेवक लकी नंदा आदी उपस्थित होते.
कॉँग्रेसचीही चिडीचूप
अमरावती लोकसभा मतदारसंघातून कॉँग्रेसच्या उमेदवाराला संधी मिळावी, अशी मागणी सतत होत होती. अलीकडेच अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बालाराम बच्चन यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यातही अनेकांनी हीच मागणी रेटली. परंतू अचानक घडलेल्या राजकीय उलथापालथीनंतर राष्ट्रवादीच्या घड्याळीचे काटे नवनीत राणा-कौर यांच्याकडे वळले. याबद्दल राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता असली तरी कॉँग्रेसने मात्र, ‘हाताची घडी तोंडावर बोट,’ अशी भूमिका तूर्तास घेतली आहे.