आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, National Congress Party's Potentially Candidates Issue, Divya Marathi

'अळी मिळी गुपचिळी', राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची लांबतेय यादी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- आगामी लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून हमखास विजयी होणारा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप गवसला नाही. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामुळे दुसरीकडे बहुजन समाज पक्ष, भारिप-बहुजन महासंघ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रहार, आम आदमी पार्टीसह इतर पक्षांनीही ‘अळी मिळी गुपचिळी’ची भूमिका स्वीकारत ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ असे धोरण ठेवले आहे.

निवडणूक रिंगणात असलेले रिपाइं-राष्ट्रवादीचे मागील निवडणुकीतील उमेदवार डॉ. राजेंद्र गवई, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिनेश बूब, युवा स्वाभिमानच्या नवनीतकौर राणा, बांधकाम व्यावसायिक गुणवंत देवपारे या सर्व संभाव्य उमेदवारांच्या नावावर राष्ट्रवादीचे अद्यापही मंथन सुरू आहे. या नावांव्यतिरिक्त मागील निवडणुकीतील प्रहारचे उमेदवार डॉ. राजीव जामठे, प्रा. गंगाधर गाडे यांनी अमरावती मतदारसंघात निवडणूक लढवायची की नाही, याबाबत कोणतीही ठोस भूमिका अद्याप घेतलेली नाही.

राष्ट्रवादीचे नेते संभ्रमात
राष्ट्रवादीच्या शहरातील वेगवेगळ्या गटांकडून वेगवेगळ्या नावांचा आग्रह सुरू असल्याने अंतिम निर्णय घेणारे नेतेच संभ्रमात पडले आहेत. विजयी समीकरणाबाबत स्थानिक नेत्यांकडून वेळोवेळी व्यक्त होणार्‍या तर्क-वितर्कामुळे राष्ट्रवादीची निवड समिती गोंधळात पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीचा उमेदवार एकदा जाहीर झाला, की उर्वरित उमेदवारांच्या नावावर तिकीट देण्याच्या दृष्टिकोनातून विचार करायचा, असे धोरण अन्य पक्षांनी स्वीकारले आहे.

भारतीय प्रशासनिक सेवेतील (आयएएस) निवृत्त अधिकार्‍यांनी केंद्रीय मंत्री शरद पवार अणि प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन गुणवंत देवपारे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून नवनीतकौर राणा यांच्यासाठी उमेदवारीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पक्षाचे प्रदेश महासचिव संजय खोडके यांच्या गटाचा त्यांच्या नावाला प्रखर विरोध आहे. ‘घड्याळ’ या चिन्हावर लढण्यास रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई यांनी स्पष्ट शब्दांत होकार वा नकार कळवलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गवईंना डावलले, तर रिपब्लिकन जनतेत राष्ट्रवादी काँग्रेसविषयी चुकीचा संदेश जाऊ शकतो. हा राजकीय धोका ओळखून राष्ट्रवादीची निवड समिती विचारविनिमयात गुंतली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत संभ्रम अद्यापही कायम असल्याने इतर पक्षांनीही आपल्या उमेदवारांबाबत घोषणा करणे टाळले आहे. यामुळे यंदा अमरावती लोकसभेची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये आहे. राष्ट्रवादीच्या खेळीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.