आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Ncp Dismissal To Khodake, Divya Marathi

खोडके यांच्या बडतर्फीने राष्ट्रवादीला बसणार फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच जिल्ह्यात पक्षाची पाळेमुळे रुजवणारे, सुलभा खोडके यांच्या रूपाने मिळवलेली पाच वर्षांची आमदारकी, मागील पंधरा वर्षांत शहरासह ग्रामीण भागात बळकट केलेले संघटन आणि महापालिकेत 19 नगरसेवक निवडून आणणारे प्रदेश महासचिव संजय खोडके यांना बडतर्फ केल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला जबर फटका बसण्याची शक्यता बळावली आहे.

संजय खोडके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांनी शनिवारी पाठवले. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. शासकीय सेवेत असताना तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक म्हणून संजय खोडके यांचा अप्रत्यक्षपणे राजकारणात प्रवेश झाला. मात्र, त्यानंतर महिला बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून खोडके यांनी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादीचे स्थान बळकट केले. 2004 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बडनेरा मतदारसंघात सुलभा खोडके यांना आमदार म्हणून विजयी करण्यात संजय खोडके यशस्वी झाले. त्यानंतर खर्‍या अर्थाने खोडके दाम्पत्याने जिल्ह्याच्या राजकारणात बळकटी मिळवली तसेच जिल्ह्यातील प्रमुख राजकारण्यांच्या यादीत संजय खोडके यांचे नाव अग्रक्रमाने जोडले गेले. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्याचे खरे र्शेय खोडके दाम्पत्यालाच आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातूनही त्यांनी राजकारणावर चांगलीच पकड निर्माण केली.
सिद्धिविनायक महिला बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी माजी आमदार सुलभा खोडके यांचे जिल्हय़ात विशेष काम आहे. प्रवीण खोडके मेमोरिअल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातदेखील खोडके दाम्पत्याने वेगळा ठसा उमटवला.

महापालिकेतील राष्ट्रवादीच्या 17 नगरसेवकांसह चार अपक्ष नगरसेवक आजही खोडके यांच्यासोबत आहेत. संजय खोडके यांच्या बडतर्फीमुळे जिल्ह्यात नाराज झालेल्या कार्यकर्त्यांचा मोठा फटका राष्ट्रवादीला लोकसभेच्या निवडणुकीत बसण्याचीच शक्यता आता बळावली आहे. येत्या सोमवारी गुढीपाडव्याला कार्यकर्त्यांची जंगी बैठक छत्रीतलाव बगिचा येथे आयोजित केली आहे. या बैठकीत खोडके कोणती ‘गुढी’ उभारतात, याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.