आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Problem To Police In Rana Adsul Fighting, Divya Marathi News

वाद कुणाचा, त्रास कुणाला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातील उमेदवार आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा यांच्यातील वाद पोलिसांत पोहोचल्यानंतर भविष्यातील तणाव टाळण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी दोघांनाही सुरक्षा पुरवली आहे. मागणी झाल्यास शहर पोलिसांकडूनदेखील दोघांना सुरक्षा प्रदान केली जाईल. या राजकीय घटनाक्रमाचा पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण आला असून, निवडणूक काळात जिल्ह्यात होणार्‍या दोन्ही उमेदवारांच्या कार्यक्रमांवर ‘पोलिस वॉच’ राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मराठी खासगी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात रविवारी (दि. 16) शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि राष्ट्रवादीच्या नवनीत राणा यांच्यात वाद झडल्यानंतर राणा यांनी अडसुळांविरुद्ध गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मंगळवारी (दि. 18) संबंधित वृत्तवाहिनीने कार्यक्रमातील घटनाक्रम जसाच्या तसा दाखवल्यानंतर शिवसैनिक व भाजप नेते, कार्यकर्ते गाडगेनगर पोलिस ठाण्यात धडकले. अडसुळांवर चुकीच्या पद्धतीने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची त्यांची मागणी होती.
निवडणूक काळात दोन्ही गटांतील विरोध आणि राजकीय वाद गंभीर स्वरूप घेऊन अघटित घडू नये म्हणून ग्रामीण पोलिसांनी खासदार अडसूळ आणि नवनीत राणा यांना प्रत्येकी दोन-दोन पोलिस कर्मचार्‍यांची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात जेथे-जेथे त्यांचे कार्यक्रम होतील, त्या ठाण्यांमध्ये राखीव पोलिस तैनात करण्यात येतील. संबधित ठाणेदारांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, नवनीत राणा यांच्या मागणीवरून शहर पोलिसांनी राणा यांना दोन महिला पोलिसांची सुरक्षा प्रदान केली. खासदार अडसुळांनी मागणी केल्यास त्यांनाही सुरक्षा प्रदान करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.
दोन उमेदवारांमध्ये रविवारपासून पोलिसांत गेलेला वाद अजूनही शमला नाही. राणा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खासदार अडसूळ व त्यांच्या 10 ते 14 सर्मथकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ते गुन्हे मागे घेण्यात यावे, यासाठी मंगळवारी अडसूळ सर्मथक गाडगेनगर ठाण्यात पोहोचले होते. बुधवारी आमदार अभिजित अडसूळ यांनी याच प्रकरणात पोलिस आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेकला यांची भेट घेतली. दोन प्रमुख पक्षांदरम्यान झालेल्या राजकीय घटनाक्रमाचा पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण आला असून, मतदान होईपर्यंत पोलिसांना ही डोकेदुखी राहणार आहे.