पाटणबोरी - इंग्रजीमाध्यमाकडे विद्यार्थी पालकांचा वाढता कल, त्याअनुषंगाने गावोगावी सुरू झालेल्या इंग्रजी शाळा, कॉन्व्हेंटमुळे मराठी माध्यमाच्या विशेषत: जिल्हा परिषद शाळांची पुरती वाट लागली आहे.काहीही झाले तरी
आपले काही बिघडत नाही, अशी मानसिक बाळगणाऱ्या शिक्षकांच्या टाइमपास सेवेमुळे वर्गांमधील पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे.
गावच्या लोकसंख्येचा अंदाज घेऊन जिल्हा परिषदेने बांधलेल्या एकेकाळी विद्यार्थ्यांनी गजबजणाऱ्या शाळांना आज भयाण वास्तूचे स्वरूप प्राप्त होत आहे. शाळेची इमारती प्रशस्त असली, तरी त्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र नगण्य आहे. असाच काहीसा प्रकार महाराष्ट्र-आंध्र सीमेवरील डोर्ली (दाभा) या गावात सुरू आहे. चौथीपर्यंत शिक्षणाची सोय असलेल्या या शाळेत एकूण चार वर्ग, तीन विद्यार्थी आणि या तीन विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दोन शिक्षक कार्यरत आहेत. या उलट परिस्थिती तालुक्यातील इतर शाळांची आहे. या प्रकाराकडे शिक्षण विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
शाळेतील पहिल्या वर्गात शून्य, दुसऱ्या वर्गात दोन, तिसऱ्या वर्गात एक आणि चौथ्या वर्गात शून्य, असे तीन विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत. शाळेची स्वतःची स्वतंत्र इमारत असून, किचनशेड करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, वीजपुरवठासुद्धा सुरू आहे. काही वर्षांपूर्वी या शाळेत साधरणतः २० ते २५ विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र, इंग्रजी शाळांचे वाढलेले फॅड पाहून पालकांनी आपला पाल्य कॉन्व्हेंटकडेच वळवला आहे. जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा अत्यंत खालावला आहे; तरीसुद्धा शासन शिक्षकांच्या वेतनावर वर्षांकाठी लाखो रुपये खर्ची घालत आहे. विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला शैक्षणिक कार्य सुधरवण्याची गरज निर्माण झाली आहे.
शिक्षकांची मुले खासगी शाळेत
जिल्हापरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकाचाच मुलगा खासगी शाळेत शिक्षण घेत असतो. त्यामुळे त्यांनाच जिल्हा परिषदेच्या शिक्षणावर विश्वास राहिला नसल्याचे स्पष्ट होते. परिणामी, आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा दिवसेंदिवस ओस पडत आहेत.
पालिकेचे शिक्षक करताहेत विद्यार्थ्यांची शोधमोहीम
जिल्ह्यातआजघडीस दहा नगरपालिका सुरू आहेत. या गावात तालुक्याच्या बऱ्याच शाळा सुरू आहेत. मात्र, तेथील शिक्षणही खालावले गेले आहे. परिणामी, शिक्षकांवर विद्यार्थ्यांची शोधमोहीम करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत शिक्षक दारोदार भटकंती करून विद्यार्थ्यांना नगरपालिकेच्या शाळेत प्रवेश द्यावा, अशी आर्त हाक देत आहेत.
खासगीशाळा करताहेत ‘डाटा कलेक्ट’
विनाअनुदानिततत्त्वावर सुरू असलेल्या शाळा चालवताना संस्थाचालकाला अक्षरश: कसरत करावी लागत आहे. त्यामुळे त्यांनीसुद्धा शाळेतील शिक्षकांना ‘डाटा कलेक्ट’ करण्याचे सुचवले आहे. दरम्यान, प्रत्येक नगरात, गावातील वॉर्डात जाऊन विद्यार्थ्यांची माहिती गोळा करणे सुरू आहे. त्यात पालकांशी संपर्क साधण्यात येत असून, पाल्याचा प्रवेश शाळेत निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.