आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालयातच झोपले ‘प्रहार' चे कार्यकर्ते, वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे तीव्र संताप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- रात्रीच्यावेळी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे तक्रार करुनही कुणीच आल्याने त्रस्त आणि संतप्त नागरिकांसह प्रहारचे कार्यकर्ते एमआयडीसी परिसरातील महावितरणच्या कार्यालयात पोहोचले. तेव्हा एक चौकीदार वगळता कार्यालयात कुणीच हजर नव्हते असा आरोप करून प्रहारचे शहराध्यक्ष धीरज जयस्वाल यांच्यासह सात ते आठ कार्यकर्त्यांनी शुक्रवारची रात्र कार्यालयातच झोपून काढल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळ्याच्या दिवसांमधील विजेचा हा लंपडाव थांबला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहारतर्फे देण्यात आला आहे.
शहरातील एमआयडीसी वीज उपकेन्द्रातंर्गत येणाऱ्या गोपालनगर, कैलासनगर परिसरात शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास एका डीबीचा शुक्रवारी रात्री अचानकपणे भडका उडाला .त्यामुळे या डीबीच्या परिसरातील अन्य भागातील वीजपुरवठा खंिडत झाला. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे परिसरातील नागरिक चांगलेच संतप्त झाले होते. परिसरातील नागरिक प्रहार कार्यकर्ते रात्री जमले. नागरिकांनी महावितरणच्या तक्रार निवारण केन्द्रावर फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही.त्यानंतर रात्री बारा वाजताच्या सुमारास धीरज जयस्वाल नागरिक एमआयडीसी परिसरातील महावितरणच्या कार्यालयात पोहोचले. तेव्हा कार्यालयात एकही अधिकारी कर्मचारी हजर नव्हता. केवळ चौकीदार उपस्थित होता, असे जयस्वाल यांनी सांगितले.
रात्री साडे अकरा वाजता डीबीचा भडका उडाल्यामुळे तत्काळ वीजपुरवठा सुरळीत होणे कठीण तर घरात कुलर किंवा पंख्याशिवाय झोपणे अशक्य होते.त्यामुळे धीरज जयस्वाल, पवन मुठाळ, सागर दिवान, गोलू अर्डक, कन्हैय्या जयस्वाल, आनंद थोरात, नितीन डगवार, रुपेश चपटे यांच्यासह सात ते आठ कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयात झाेपण्याचा निर्णय घेतला.
शेवटी धीरज जयस्वाल यांच्यासह सात ते आठ कार्यकर्ते रात्रभर महावितरणच्या कार्यालयात झोपले होते. शनिवारी (दि.९)सकाळी महावितरणचे अधिकारी कर्मचारी तातडीने कैलाशनगरातील जळालेल्या डि. बी.च्या सुधारणेसाठी पोहोचले होते. दोन तासाच्या कामानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र शुक्रवारची रात्र नागरिकांना असह्य उकाड्यातच काढावी लागली.
तांत्रिक अडचणीमुळे वीजपुरवठा होता बंद
गोपलनगरभागातील एका डी.बी.वर शुक्रवारच्या रात्री तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने वीजपुरवठा बंद झाला होता. रात्री बारा वाजल्याने दुरुस्ती शक्य नव्हती. शनिवारी सकाळी आम्ही तो सुरळीत केला आहे. रात्री नागरिकांचे फोन आले. त्यांच्या संपर्कात होतो.आमच्या कार्यालयात कोणीही झोपले नाही. तातडीने अडचण दूर करून ग्राहकांना अधिकाधिक सुरळीत सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-संजय श्रृंगारे, अतिरिक्तकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी.

उग्र आंदोलन करणार
वारंवारखंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोत होत आहे.रात्री वीज गेल्यावर तक्रार निवारण केंद्रात फोन करूनही कुणी आले नाही. म्हणून कार्यालयात गेलो तेव्हा तेथे फक्त एक चौकीदार हजर होता. अधिकारी कर्मचारी हजर नव्हते. अशावेळी आम्ही शुक्रवारची रात्र कार्यालयातच झोपून काढली. भविष्यात वीजपुरठ्यात सुधारणा झाल्यास उग्र आंदोलन केले जाईल.
- धीरज जयस्वाल, शहरप्रमुख,प्रहार संघटना.
वीजपुरवठा खंडित होण्याचे वाढले प्रमाण
सध्यातपमान दरदिवशी वाढतच आहे. ४३ अंशाच्या आसपास सध्या पारा असतो. अशा या उकाड्यात प्रत्येकालाच घरात प्रवेश करताच पंखे किंवा कुलरची आवश्यकता भासते. यातच वांरवार वीजपुरवठा खंडीत होतो. सध्यास्थितीत ही परिस्थिती शहरातील सर्वच भागात आहे. याऊलट विज ग्राहकांना महावितरणकडून विजदेयक सिक्युरीटी डिपॉजिटच्या रुपात वसूली सुरूच आहे. अशावेळी अखंडीत विजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी नागरीकाकडून होत आहे. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारची रात्र कार्यालयात झोपून काढताच दुसऱ्या दिवशी दुरुस्ती झाली.
बातम्या आणखी आहेत...