आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prakash Ambedkar News In Marathi, Bharip Bhujan Sangh, Sharad Pawar

पवारांना भाजपसोबत जायचे आहे,प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शरद पवारांना भाजपसोबत जायचे असून, सेना-भाजपचे उमेदवार निवडून आणण्याचे त्यांचे छुपे राजकारण असल्याचा गौप्यस्फोट अँड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (दि. 8) केला. शहरातील दसरा मैदान येथे रिपाइं, भारिप बहुजन महासंघ, प्रहार, भाकप, माकप आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर आमदार हरिभाऊ भदे, बच्चू कडू, कमलताई गवई, माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले, प्रवीण मनोहर, संजय देशमुख व आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.


डॉ. आंबेडकर रिसोड येथे प्रचारात व्यस्त असल्यामुळे गवई यांच्या प्रचारसभेला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी सभेला मोबाइलवरून अंदाजे पाच ते सात मिनिटे संबोधित केले. डॉ. आंबेडकर पुढे म्हणाले, खोडकेंचा देवपारेंना असलेला पाठिंबाही पवारांचा हेतू साध्य करण्यासाठीच आहे. काँग्रेस-राकाँने आतापर्यंत आंबेडकरी चळवळीचा केवळ स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला आहे. सध्या त्यांना ही चळवळ बंद पाडायची असल्याची टीकाही त्यांनी केली.
डॉ. राजेंद्र गवई म्हणाले, शरद पवार, अनिल देशमुख यांनी मी राकाँच्या चिन्हावर निवडणूक लढवावी यासाठी खूप प्रयत्न केले. यासाठी दादासाहेबांनी रिपाइंचा राजीनामा देऊन राकाँत प्रवेश घेण्याचा सल्ला दिला होता. दादासाहेब म्हणाले होते, यामुळे तू सहज निवडूनही येशील; परंतु याचे मला दु:ख होईल. यामुळे जेथे माझा जन्म झाला, तेथूनच लढण्याचा मी निर्णय घेतला. विदर्भाचे चित्र बदलवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील लोक नेतेपदी नको. दादा, बाबा, आबांना आवर घालण्यासाठी येथील नेते निर्माण करावे लागणार असल्याचेही ते म्हणाले. आमदार हरिभाऊ भदे म्हणाले, काँग्रेस, राकाँ, सेना-भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, त्यांनीही मागासवर्गीयांचा गैरफायदाच घेतला. त्यांच्या कार्यकाळात शेतकरी सुखी झाला नाही. काँग्रेसने देशाचे वाटोळे करण्याचे काम करून चळवळी नष्ट केल्या. काँग्रेस गोरगरीबांचा पक्ष नसून, धनदांडग्यांचा पक्ष झाला आहे. सामान्यांना लाचार करण्याचे काम काँग्रेसने केले. या सत्ताधार्‍यांनी आतापर्यंत बहुजन समाजाचा वापर केला. रिपाइं आघाडीच्या माध्यमातून आता परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे. दिल्लीच्या गादीसाठी गल्लीत भांडणे होत असतील, तर देशाचे तुकडेच होतील. हिंदूंचे राजकारण करण्यासाठी मोदी निघाले आहेत. देशात गुण्यागोविंदाने नांदण्याची संधी भाजप देणार नाही.


तो जाणता, की हा जाणता राजा! : बच्चू कडू
छत्रपती शिवरायांनी अठरापगड जाती एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली होती. त्यांना सोबत घेऊनच ते लढले. राज्य स्थापन करता आले नाही, तरी चालेल; पण शेतकर्‍यांच्या पिकाच्या देठाला हात लावू नका, ही त्या जाणत्या राजाची शिकवण होती. शेतकर्‍यांच्या भल्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना छत्रपतींच्या सुराज्यात केल्या जात होत्या; परंतु कृषिमंत्री असलेल्या ‘जाणत्या राजा’च्या कार्यकाळात साडेतीन लाखांवर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. परंतु हा ‘जाणता राजा’ कधी मुक्कामी आला नाही. काही दिवसांपूर्वी पवारांना एकाने थापड मारली असता, या राणांनी जिलेबी वाटली होती. त्यांच्या पत्नीने अजित पवारांच्या पुतळ्याला चपलेने बडवले होते. त्यांनाच तिकीट देऊन निवडून आणण्यासाठी काका-पुतणे दोन-दोन दिवस कसे काय मुक्काम ठोकून राहू शकतात, अशी टीका आमदार कडू यांनी केली. ते म्हणाले, जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे.


व्यासपीठावर गर्दी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आघाडीतील प्रमुख पदाधिकार्‍यांना व्यासपीठावर बसण्यासाठी आमंत्रित करीत होते. त्यामुळे व्यासपीठावर अंदाजे तीस-चाळीस पदाधिकारी बसले होते. बसण्यासाठी जागा अपुरी पडत होती. त्यानंतरही पदाधिकार्‍यांना व्यासपीठावर आमंत्रित करणे सुरूच होते. व्यासपीठावर पदाधिकार्‍यांची गर्दी झाली होती. ज्येष्ठ पदाधिकारी आल्यास काही पदाधिकारी व्यासपीठावरून खाली उतरत असत. एका वक्त्याने आपल्या भाषणात सोफे पदाधिकार्‍यांच्या गर्दीने तुटण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले.


अमरावतीत ‘उसना’ पालकमंत्री
राज्याच्या मंत्रिमंडळात पुणे विभागातील एकूण 19 मंत्री असल्याचे कडू यांनी सांगितले; परंतु जिल्ह्याच्या नशिबी मात्र ‘उसना’ पालकमंत्री आल्याचे ते म्हणाले. विविध मंत्र्यांच्या नावांची यादीच कडू यांनी वाचून दाखवली. जिल्ह्याच्या पदरात आतापर्यंत केवळ राज्यमंत्र्यांचेच पद पडल्याचे ते म्हणाले.