अचलपूर- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आम आदमी पार्टीने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेची या निवडणुकीत नेमकी काय भूमिका राहणार, याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यासाठी अचलपूरमध्ये येत्या रविवारी (दि. 9) कार्यकर्त्यांची जिल्हास्तरीय बैठक होत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून खासदार आनंदराव अडसूळ, राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा, आम आदमी पार्टीने प्रा. भावना वासनिक यांना उमेदवारी दिली आहे. 2004 च्या निवडणुकीत हा मतदारसंघ खुला असताना प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू रिंगणात होते. 2009 मध्ये अनुसूचित जातीकरिता राखीव झाल्याने प्रहारने डॉ. राजू जामठे यांना निवडणूक रिंगणात उतरवले. डॉ. जामठे 64,434 मते मिळवून तिसर्या क्रमांकावर राहिले होते. त्यांना अचलपूर विधानसभा क्षेत्रातून 21,599, तिवसा मतदारसंघातून 13,904, धारणीमधून 10,313, दर्यापूरमधून 8009, बडनेरातून 6167, तर अमरावती विधानसभा क्षेत्रातून 4442 मते मिळाली होती. त्यामुळे प्रहारच्या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.