अमरावती- चांदुर रेल्वे- विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पंचसूत्री जाहीर केली.
1) फार्म टू फायबर
2) फायबर टू फॅब्रिक
3) फॅब्रिक टू फॅशन आणि
4) फॅशन टू फॉरेन या पंचसूत्रीमुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अधिक नफा मिळेल, असा दावा पंतप्रधानांनी केला.
कपाशीच्या उत्पादनानंतर सूत काढण्यापासून ते आधुनिक फॅशनचे वस्त्र तयार करणारे सर्व उद्योग विदर्भात कसे सुरू करता येईल, यावर योजना आखण्याचे काम सुरू असल्याचे मोदी यांनी सांगितले. तयार केलेले आधुनिक वस्त्र विदेशात निर्यात करता येतील. परिणामी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल आणि यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून आम्ही परावृत्त करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अमरावती जिल्ह्यातील धामणगावरेल्वे मतदारसंघातील चांदुर रेल्वे येथे मोदी यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचाराकरिता शुक्रवारी जाहीर सभा घेतली. या वेळी भाजपचे उमेदवार अरुण अडसड, निवेदिता चौधरी, डॉ. अनिल बोंडे, तुषार भारतीय, डॉ. सुनील देशमुख, प्रभुदास भिलावेकर, अशोक बनसोड, आमदार प्रवीण पोटे, शिवराय कुलकर्णी, दिनेश सूर्यवंशी, रवींद्र खांडेकर मंचावर उपस्थित होते. मोदी यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्येवर चिंता व्यक्त केली. मोदी म्हणाले, अमरावती आणि नागपूरची संत्री जगभर प्रसिद्ध आहे. येथील शेतकरी संत्रा पिकवतो. या संत्र्याचा रस देश-विदेशातील नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देतो. स्वत: मात्र विष पिऊन आत्महत्या करतो.
नियोजित वेळेपूर्वीच मोदींचे आगमन
सभेचीदुपारी १२ चा वेळ देण्यात आली होती. मात्र, नियोजित वेळेच्या पंधरा मिनिटे अगोदरच नरेंद्र मोदी यांचे वायुदलाच्या विशेष हेलिकॉफ्टरने सभास्थळी आगमन झाले. मोदींची झलक बघताच जमलेल्या प्रचंड जनसमुदायाने ‘मोदी... मोदी... मोदी...’ अशा जयघोषाने त्यांचे स्वागत केले. १२ वाजून २३ मिनिटांनी मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली आणि १२ वाजून ३३ मिनिटांनी भाषण संपवले.
‘पेप्सी'च्या अधिकाऱ्यांनाकेली सूचना
अमेरिकेतपेप्सी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट झाली, तेव्हा त्यांना सूचना केली, की पेप्सी आणि कोका कोला सारख्या शीतपेयांमध्ये ताज्या फळांचा रस समाविष्ट करता येत असेल, तर विचार करा असे मोदी यांनी सांगितले. यामुळे संत्रा, मोसंबी आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल. केंद्र सरकारच्या फळ संशोधन प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांनाही यावर संशोधन करण्याच्या सूचना दिल्याचे मोदी यांनी सांगितले.
लोकसभेच्या १९९७ च्या निवडणुकीत वर्धा येथे पोस्टल मैदानावर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची सभा झाली होती. या सभेनंतर मागील १७ वर्षांच्या कालखंडानंतर चांदुर रेल्वे येथे झालेली ही सर्वांत मोठी जाहीर सभा आहे. ३८ एकरांचे संपूर्ण मैदान श्रोत्यांनी खचाखच भरले होते. सभा संपल्यावरही मैदानाकडे येणारे माणसांचे लोंढे सुरूच होते. दीड लाखांहून अधिक नागरिक या सभेकरिता उपस्थित होते, असा पोलिस प्रशासनाचा अंदाज आहे. सभेकरिता व्यवस्था करण्यात आलेल्या मैदानात दोन लाख लोकं बसू शकतील, एवढी क्षमता होती. सभेला येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या नेतृत्वात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दीड हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त यासाठी तैनात होता.