चांदुर रेल्वे- पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारी (दि. 10) सकाळी दहा वाजता होणा-या प्रचार सभेसाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षेच्या कारणावरून नागरिकांनी पाण्याच्या पाऊचशिवाय कोणतीही वस्तू सोबत आणू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी गुरुवारी केले.
पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत माहिती देण्यासाठी येथे आयोजित पत्रकारपरिषदेत प्रभू बोलत होते. कुऱ्हा मार्गावर होणाऱ्या प्रचार सभेसाठी बांधकाम, महसूल, दूरसंचार, वीज वितरण कंपनी, पोलिस विभाग मागील आठ दिवसांपासून जय्यत तयारी करीत आहे. सभेसाठी १५०० पोलिस कर्मचारी, 175 पोलिस अधिकारी, चार पोलिस अधीक्षक, चार अतिरिक्त पोलिस अधीक्षक, १५ डीवायएसपी, 38 पोलिस निरीक्षक, 118 सहायक पोलिस निरीक्षक, राज्य
राखीव पोलिस दलाची एक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सभेला दोन लाख नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे.सभास्थळापासून दीड किलोमीटरवर नागरिकांसाठी सात ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था कडक असल्यामुळे नागरिकांनी पाण्याच्या पाऊचशिवाय इतर कोणतीच वस्तू सोबत आणू नये असे आवाहन प्रभू यांनी केले.