आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमधील जन्मठेपेच्या दोन फरार कैद्यांना बडनेरात पकडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- खुनाचा आरोप सिद्ध झाल्याने जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आणि कारागृहातून पॅरोलवर सुटल्यानंतर फरार झालेल्या दोघांना अमरावती ग्रामीण पोलिसांनी बडनेरा रेल्वे स्थानकाजवळ अटक केली. हे दोघेही कैदी बडनेरा येथून रेल्वेने अहमदाबादला पळून जाण्याच्या तयारीत होते.

महेंद्र तिडके (30) आणि मंगेश डाहे (26) ही अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आजाराचे कारण सांगून महेंद्र 15 जुलै 2013 रोजी कारागृहातून एक महिन्याच्या अभिवचन रजेवर सुटला होता. मंगेशनेही याच कारणासाठी 26 एप्रिल 2013 पासून एक महिन्याची अभिवचन रजा घेतली होती. परंतु, दोघेही परत न आल्याने कारागृह अधिकार्‍यांनी अनुक्रमे चांदूरबाजार आणि खल्लार पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सोमवार (दि. 13) मंगेश आणि महेंद्र बडनेरा येथून अहमदाबादला जाणार होते. त्यापूर्वीच ते पोलिसांच्या हाती लागले. पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक के. आर. वानखडे, एम. डब्ल्यू. गावंडे, पोलिस हेडकॉस्टेबल अरुण मेटे, मूलचंद भांबूरकर, त्र्यंबक मनोहरे, प्रवीण देशमुख, सुनील महात्मे, मोहन मोरे, सचिन मिर्शा, शकील चव्हाण, सईद यांनी कारवाईत सहभाग घेतला.

फरार झालेल्या कैद्यांविरुद्घ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिवचनाचे कलम मोडल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अमरावती ग्रामीण पोलिसांनी दिली. या कारवाईनंतर दोन्ही कैद्यांना यापुढे पॅरोलच्या सवलतीतून बाद केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी कारागृह विभागाकडे संबंधित कारागृह अधिकारी लवकरच अहवाल पाठवणार आहेत.


अहमदाबादचा फसला बेत
ठरल्याप्रमाणे महेंद्र आणि मंगेश नव्यानेच सुरू झालेल्या नरखेड-भुसावळ पॅसेंजरने बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्यानंतर ते बडनेरा येथूनच रेल्वेने अहमदाबादला जाणार होते. ही बाब पोलिसांना आधीच कळली होती. त्यामुळे पोलिस साध्या वेशात सापळा रचून होते. महेंद्र व मंगेश स्टेशनवर आले आणि पोलिसांच्या सापळ्यात अडकले.