आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायासाठी लढा : पाच उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - नांदगावपेठ येथील वाढीव मोबदल्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण बुधवारी तिसर्‍या दिवशीही सुरूच होते. यात 80 ते 82 वर्षे वयाच्या पाच वयोवृद्ध उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर झाली असताना प्रशासनाकडून मात्र अद्यापही दखल घेण्यात आली नाही. मात्र, अशाही अटीतटीच्या परिस्थितीत उपोषणकर्त्यांनी बुधवारी मंडपात शिवजयंती साजरी केली. सोमवारपासून हे प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले आहेत. बुधवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून विशेष अधिकारी ए. एम. चौधरी यांनी आंदोलकांचे प्रमुख प्रवीण मनोहर यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली.

वाढीव मोबदल्याबाबत सरकारदप्तरी कार्यवाही सुरू झाल्याचे सांगत त्यांनी आंदोलकांपुढे हा प्रस्ताव ठेवला. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी आंदोलनकर्त्यांना ठोस आश्वासन मिळण्याची शक्यता आहे. उपोषण करणार्‍यांपैकी किसनराव वानखडे (82), महादेवराव मेर्शाम (82), सुखदेवराव मेर्शाम (78), शेख मेहबूब शेख इसा (75) आणि वासुदेवराव लव्हाळे (71) यांची प्रकृती चिंताजनक आहे. मागील 72 तासांपासून या वृद्ध उपोषणकर्त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. अशा परिस्थितीतही जिल्ह्यातील राजकारणी मंडळींकडे उपोषण मंडपाला भेट देऊन साधे सांत्वन करण्याचादेखील वेळ नसल्याचे आंदोलक प्रवीण मनोहर यांनी दै.‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

नांदगावपेठ एमआयडीची प्रश्न हा आमदार यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघातील आहे. बुधवारी तिसर्‍या दिवशी माजी आमदार पांडुरंग ढोले, संजय बंड, आमदार यशोमती ठाकूर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत आमदार अँड. ठाकूर उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याशी बातचीत करणार आहेत.

न्याय्य लढय़ाचा असा आहे घटनाक्रम
1. 1993-94 साली नांदगावपेठ औद्योगिक क्षेत्राकरिता जमीन संपादित केली.
2. शेतकर्‍यांना अत्यल्प मोबदला मिळाला.
3. काही शेतकर्‍यांनी न्यायालयात धाव घेतली.
4. अकरा वर्षांनी शेतकर्‍यांना सव्वादोन लाख रुपये प्रतिहेक्टर मोबदला देण्याचे मान्य.
5. कलम 28-अ नुसार, न्यायालयात गेलेल्या शेतकर्‍यांना मोबदला नाही.
6. आंदोलन करता करता शेतकरी वयोवृद्ध झाले.