अमरावती - मरण पत्करेल; पण हलणार नाही, उपोषणाले कशासाठी बसलो, असा सज्जड दम नांदगावपेठ एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना बुधवारी (दि.१२ ) दिला. वैद्यकीय चाचणीनंतर प्रकृती गंभीर असल्याने चौघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले जाणार होते. तिघांनी वैद्यकीय उपचारास होकार, तर एका शेतकऱ्याने नकार देत चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्याला खडे बोल सुनावले.
मागील तीन दिवसांपासून बेमुदत उपोषण करणाऱ्या ३३ पैकी चार प्रकल्पग्रस्तांची प्रकृती बुधवारी गंभीर झाली. त्यांपैकी वासुदेवराव गव्हाळे या शेतकऱ्याने उपचार घेण्यास नकार दिला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओएसडी डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी सकाळी उपोषणग्रस्तांची आरोग्य तपासणी केली. गव्हाळे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांिगतले. त्याचवेळी तहसीलदार सुरेश बगळे चर्चेकरिता उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी उपचार घेण्याची विनंती केली असता शेतकऱ्यांनी तहसीलदारांना खडे बोल सुनावले.
साडेसात कोटींचा वाढीव मोबदला
आरडीसीतेजूसिंग पवार यांनी बुधवारी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून वाढीव मोबदल्याची मागणी मान्य केली.वाढीव मोबदल्याचे सात कोटी ४७ लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे जमा झाला आहे. सोमवारपासून त्याचे वितरण केले जाणार असल्याचे प्रकल्पग्रस्तांचे नेते प्रवीण मनोहर यांनी स्पष्ट केले.