आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती शहरवासीयांना मालमत्ता करवाढीचा बसणार दणका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अमरावतीकरांवर आता बाजारभावावर आधारित भांडवली मालमत्ता कराचा बोजा पडणार आहे. बाजारभाव तसेच बांधकाम मूल्यांवर आधारित मालमत्ता कर आकारण्याच्या दृष्टीने महापालिकेने मूल्यांकन कार्य आरंभ केले आहे. नवीन रचनेवर आधारित करवसुली 2014-15 या आर्थिक वर्षात सुरू होणे महापालिकेला अपेक्षित आहे.

महापालिका क्षेत्रात मार्च 2013 नुसार असलेल्या एक लाख 21 हजार 400 मालमत्तांचे भांडवली कर आकारण्याच्या दृष्टीने मूल्यांकन केले जाणार आहे. त्यामध्ये नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या सुमारे दोन ते अडीच हजार नवीन मालमत्तांचादेखील समावेश राहील. भांडवली मूल्यावर कर आकारणी झाल्यास महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. सद्य:स्थितीत बांधकामानंतर मालमत्तेची कर आकारणी जुन्या म्हणजेच पाच वर्षांपूर्वीच्या प्रणालीनुसार केली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून महापालिकेच्या उत्पन्नात पाहिजे तशी वाढ झाली नाही. त्यामुळे शहरातील विकासकामांवर परिणाम होत आहे. उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुली प्रणालीत बदल न झाल्याने मूलभूत सुविधांच्या विकासकामांसाठी महापालिकेला सरकारी अनुदानावर अवलंबून राहावे लागते. नवीन बांधकाम केले जात असताना जुन्या प्रणालीमुळे काही टक्केच वाढ करवसुलीत होत आहे.

नवीन प्रणालीनुसार करवसुली झाल्यास मालमत्ता कराच्या रूपाने मोठा वाटा महापालिकेला प्राप्त होईल. सोबतच करवसुली विभागालादेखील तेवढे सक्षम करणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.

वर्तमान कर प्रणाली
अमरावती महापालिकेत मालमत्तेवर किती चौरस मीटरचे बांधकाम केले आहे तसेच बांधकामाचा दर्जा, वस्तीचा प्रकार तसेच बांधकामाचे वर्ष आदी बाबींवर मालमत्ता करनिर्धारण केले जाते. मूल्यनिर्धारण व संकलन विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील मालमत्तेचे करनिर्धारण केले जात आहे.

शासन आदेश
महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कराचे निर्धारण करण्याबाबत 2011 मध्येच सरकारने दिशानिर्देश दिले आहेत. भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी प्रणालीचा त्यासाठी अवलंब करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.

काय आहे भांडवली कर प्रणाली?
महापालिकेच्या संबंधित क्षेत्रात जमीन अथवा मालमत्तेचे भाव, वर्तमान बाजारभाव तसेच बांधकाम मूल्यानुसार मालमत्तेचे करनिर्धारण भांडवली कर प्रणालीत केले जाणार आहे. उच्चभ्रू वस्तीत राहणार्‍यांच्या मालमत्तेला अधिक बाजारभाव मिळतो. त्यानुसार मालमत्ता कराची आकारणी केली गेल्यास महापालिकेच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ होणे अपेक्षित आहे.

कर मूल्यांकन सुरू
भांडवली मालमत्ता कर आकारणी करण्याच्या दृष्टीने महापालिकेने मूल्यांकन सुरू केले आहे. नवीन इमारतींसह जुन्या इमारतीचे मूल्यांकन केल्यानंतर करनिर्धारण केले जाणार आहे. यावर्षी नाही, तर पुढील वर्षीपासून या प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. अरुण डोंगरे, मनपा आयुक्त.