आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीकर एटीएमने भरू शकतात मालमत्ता कर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मालमत्ता कर भरण्यासाठी आता धावपळ करावी लागणार नाही, तर एटीएमच्या माध्यमातून कर भरता येणार आहे. एचडीएफसी बॅंकेच्या मदतीने मनपा ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. मनपा प्रवेशद्वारासमोरच त्यासाठी एटीएम लावले जाईल. योजनेस प्रोत्साहन देण्यासाठी सर्वाधिक वसुली करणार्‍या कर्मचार्‍यांचा महापालिकेच्या वतीने सत्कारही केला जाणार आहे.

मालमत्ता करवसुलीच्या विषयात आयुक्त अरुण डोंगरे यांनी बुधवारी (11 सप्टेंबर) आढावा बैठक घेतली. मालमत्ता कर वसुली प्रणालीत सुधारणा करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मागच्या वर्षापेक्षा आगामी आर्थिक वर्षात मालमत्ता कराची जास्त वसुलीचे नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. 25 वॉर्डांतील वसुली लिपिकांना संगणकीकृत वसुली नोटिसांचे वाटप करण्यात आले. नवीन प्लॉट, फ्लॅटधारकांकडे मालमत्ता कर वसुलीची कार्यवाही करण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले.

बैठकीला उपायुक्त रामदास सिद्धभट्टी, सहायक आयुक्त राहुल ओगले, नगर सचिव मदन तांबेकर, सुषमा मकेश्वर, योगेश पिठे, सहायक कर मूल्यांकन व निर्धारण अधिकारी आर. एफ. डोंगरे यांच्यासह सर्व झोन कार्यालयांतील वसुली लिपिक उपस्थित होते.
करात मिळेल सूट: डिसेंबरपूर्वी मालमत्ता कराचा भरणा केल्यास एक टक्के सूट राहील. डिसेंबरनंतर कर भरल्यास मालमत्ताधारकांकडून दोन टक्के दंडदेखील वसूल करण्याचे प्रस्तावित आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग असल्यास करात सूट दिली जाईल.

एसएमएस अलर्ट’ :मालमत्ता कराचा भरणा करताना नागरिकांना त्यांचा मोबाइल क्रमांक महापालिका कर्मचार्‍यांना द्यावा लागेल. अशांना मालमत्ता करासंबंधी माहिती मोबाइलवर एसएमएसच्या माध्यमातून मिळेल.

पदभरती होणार : मालमत्ता कर वसुली विभाग, स्थानिक संस्था कर आणि बाजार परवाना विभागातील जागा भरल्या जाणार आहेत. पदे रिक्त असल्याने एलबीटी तसेच मालमत्ता कर वसुलीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले.

असा भरता येईल कर : नागरिकांना एटीएमवरील संगणकीय प्रणालीतील सूचनेनूसार कर भरावा लागणार आहे. संगणकीकृत कराची पावती मिळणार असून त्यावर असलेला प्रॉपर्टी क्रमांक कराचा भरणा करताना एटीएमच्या प्रणालीत नोंदवावा लागणार आहे.

मनपाचा कणा
करवसुली कर्मचारी हा मनपाच्या उत्पन्नाचा कणा आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याची संपूर्ण मदार त्यांच्यावर असते. पगारवाढ आणि डी.ए. द्यावा लागणार असल्याने महापालिकेचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे कर वसुलीवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना आहेत. अरुण डोंगरे, मनपा आयुक्त.