आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक हजार 766 पोलिस झाले पीएसआयसाठी पात्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - पीएसआय पदोन्नतीमध्ये सेवाज्येष्ठतेला प्राधान्य देण्यात येणार असल्यामुळे गुणवत्ताधारक पोलिसांना मागे थांबावे लागणार आहे. त्यामुळे नाराज पोलिसांना सेवाज्येष्ठता महत्त्वाची की गुणवत्ता, हा प्रश्न सतावत आहे.

पोलिस विभागांतर्गत पदोन्नती अहर्ता परीक्षा तब्बल अकरा वर्षांनी यंदा 30, 31 जुलै आणि 1 सप्टेंबरला घेण्यात आली. परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला. अमरावती परिक्षेत्रातील 1,924 जणांनी ही परीक्षा दिली होती. 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे 1,766 जण पीएसआय पदोन्नतीसाठी पात्र ठरले आहेत. संपूर्ण राज्यात केवळ 1 हजार 74 जागा असल्याने साहजिकच गुणवत्ता महत्त्वाची ठरेल, अशी पोलिसांना अपेक्षा होती. मात्र, गुणवत्तेपेक्षा सेवाज्येष्ठतेला महत्व देण्यात आले आहे. त्यामुळेच 50 टक्के गुण आणि अधिकाधिक सेवाज्येष्ठता प्राप्त करणार्‍या पोलिसांचा पदोन्नतीत वरचा क्रमांक राहील. या नियमामुळे ताज्या दमाचे कर्मचारी गुणवत्तेत जरी वरचढ असेल, तरी सेवा कालावधी कमी असल्याने त्यांना तूर्तास पीएसआय होण्याची संधी मिळणार नाही, असे संकेत आहेत.

अमरावती परिक्षेत्रातून 2074 जणांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. प्रत्यक्षात 1 हजार 924 जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी 408 जणांना 50 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे ते अपात्र ठरले आहेत. याचवेळी तब्बल 81 टक्के पोलिस 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण संपादन करून पात्र ठरले आहेत.

युवा पोलिसांसाठी अजून संधी
युवा पोलिसांना भविष्यात अनेकदा संधी मिळणार आहेत. या क्षेत्रात हयात घालवणार्‍या पोलिस कर्मचार्‍यालाही संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठतेचा विचार करण्यात आला. दुसरीकडे गुणवत्तासुद्धा महत्वाची आहे. गुणवत्ताप्राप्त उमेदवारांनी नाराज न होता जोमाने प्रयत्न करावेत. बिपिन बिहारी, विशेष पोलिस महानिरीक्षक

अमरावतीचा नितीन गुणवत्ता यादीत
अमरावती आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत असलेले नितीन आखरे अन्य दोन उमेदवारांसोबत 247 गुण घेऊन सामाईकपणे प्रथम आले. नितीन यांची पोलिस दलात 13 वर्षांची सेवा झाली आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठतेपुढे त्यांचे गुण माघारण्याची शक्यता आहे.