आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रस्त ग्रामस्थांनी गुंडाला यमसदनी धाडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - धमकी देणार्‍या, बळजबरी करणार्‍या नागपूर जिल्ह्यातील एका कुख्यात गुंडाला काही गावकर्‍यांनी मिळून यमसदनी धाडले. गावकरी चाल करून येत असल्याचे बघून गुंडाने स्वत:च्या बचावासाठी देशी कट्टय़ातून गोळी चालवली. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी 10.30 वाजता नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सतरापूर गावात घडली.

मोहनिस मल्लेश रेड्डी (35, रा. सतरापूर) असे मृतकाचे नाव आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, धमकावणे, शिवीगाळ करणे, बेकायदा धंदे चालवणे यासह अनेक गुन्ह्यांची मोहनिसविरुद्ध पोलिसांत नोंद आहे. त्याच्या वाढत्या गुंडगिरीला सतरापूरवासी कंटाळले होते. त्याचे अनेक गावकर्‍यांशी खटके उडाले होते. दोन दिवसांपूर्वी त्याने एका समुदायाच्या लोकांशी मुजोरी केली होती. त्या वेळी गावकर्‍यांमध्ये मोहनिसविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटली होती.

याचा वचपा काढण्यासाठी बुधवारी सकाळी 40 ते 50 लोक मोहनिसच्या घरावर चालून गेले. त्याच्या हातामध्ये लोखंडी रॉड, काठय़ा, चाकू होते. तेव्हा मोहनिस घरासमोर उभा होता. लोकांना आपल्या घराकडे येत असल्याचे बघून मोहनिस स्वत:चा बचाव करण्यासाठी घरात पळाला. त्याने घरातील देशी कट्टा काढला आणि गावकर्‍यांच्या दिशेने चालवला. याचा विशेष फायदा झाला नाही. यानंतर जमावाने मोहनिसच्या घरावर हल्ला करून त्याच्यावर लोखंडी रॉड, काठी आणि चाकूने मारहाण केली. तो रक्तबंबाळ झाला. काहींनी मोहनिसचा भाऊ मोहनलाही मारहाण केली. काही वेळाने जमाव तेथून निघून गेला. मोहनिसला डॉ. रतन रॉय यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शेखर मल्लेश रेड्डी (29) याच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी दलजित पात्रे, विवेक पात्रे, राखी पात्रे, राजन पात्रे, नयनाबाई पात्रे, शरिफा पात्रे आणि इतर नागरिकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुनीता मेर्शाम करत आहेत.