आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rain And Storm The Farmers The Number Of Jeopardy

पाऊस व गारपिटीमुळे शेतक-यांवर अस्मानी संकट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती-शुक्रवारी रात्री झालेल्या अकाली पावसाचा व गारपिटीचा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना जबर तडाखा बसला आहे. या पावसामुळे हजारो हेक्टरमधील रब्बी व खरीप पिकांचे नुकसान झाले असून, वादळी वार्‍यामुळे शेकडो घरांची पडझड झाल्याचे वृत्त आहे.

अचलपूर, चांदूरबाजार आणि मेळघाटमध्येही प्रचंड नुकसान झाल्याची नोंद महसूल खात्याने केली आहे. वरुड आणि मोर्शी तालुक्यांतील संत्रा बागांचे सर्वाधिक नुकसान होत असून, झाडांवर असलेले 60 टक्के संत्रा फळ गारपिटीमुळे खाली आली आहेत. पाच तालुक्यांना गारपिटीमुळे जबर फटका बसला असून, हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. याचवेळी मोर्शी तालुक्यातील सावरखेड गावात शेतातील एका रखवालदाराचा मृत्यू झाला आहे. हरभरा, गव्हासोबतच संत्र्यालादेखील पावसाचा फटका बसल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. दुसरीकडे अमरावती कृषिउत्पन्न बाजार समितीच्या शेडमुळे सुमारे 60 हजार क्विंटल धान्याचे नुकसान टळले आहे. दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या शेतीपिकांच्या नुकसानाची मोजदाद सुरू झाली असून, सोमवारपर्यंत नुकसानीचा निश्चित आकडा समोर येण्याची शक्यता आहे.

मोर्शी, वरुडला सर्वाधिक फटका

पावसाचा वरुडला सर्वाधिक फटका बसला. तालुक्यात 80 पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले. वरुड आणि मोर्शी तालुक्यांतील संत्रा बागा अक्षरश: तोड केल्याप्रमाणे साफ झाल्या आहेत. या वेळी बगिच्यामध्ये झाडाखाली संत्रा फळांचा खच लागल्याचे भीषण चित्र आहे. या दोन तालुक्यांसह अंजनगावसुर्जी, चांदूरबाजार आणि अचलपूर तालुक्यांतही जबर फटका बसला आहे. हे तीन तालुके मिळून जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्रातील पीक जमीनदोस्त झाले आहे. दुसरीकडे वरुड आणि मोर्शी तालुक्यांतील नुकसान लक्षात घेता विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधीक्षक यांनी शेतकर्‍यांना भेट देऊन प्रत्यक्ष शेतांची पाहणी केली. नुकसान प्रचंड असल्यामुळे शनिवारी उशिरा रात्रीपर्यंत कृषी विभागाला प्राथमिक आकडेवारी जाहीर करणे शक्य झाले नव्हते.

80 हजार क्विंटल क्षमतेचे शेड : अकाली पावसापासून धान्याच्या संरक्षणासाठी शेडची निर्मिती करण्यात आली. त्याची क्षमता 80 हजार क्विंटल आहे. सद्य:स्थितीत अमरावती कृषिउत्पन्न बाजार समितीत 50 ते 60 हजार क्विंटल धान्य असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली.

ताडपत्री देण्याचे नियोजन : पावसाचे वातावरण पाहता, धान्यावर झाकण्यासाठी यापूर्वी बाजार समितीकडून शेतकर्‍यांना ताडपत्री पुरवण्यात आली होती. आजही पावसाचे वातावरण कायम असल्याने ताडपत्री पुरवण्याबाबत बाजार समितीच्या प्रशासकांनी निर्देश दिले आहे.

60 हजार क्विंटल धान्याचे टळले नुकसान

एरवी कृषिउत्पन्न बाजार समितीला पावसाचा सर्वाधिक फटका बसत असतो. मात्र, पावसाच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने वेळीच धान्य झाकून ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, बहुतांश धान्य शेड आणि दुकानांसमोरील शेडमध्ये ठेवण्यात आल्याने बाजार समितीत नुकसानाचे प्रमाण र्मयादित राहिले. सध्या येथे शेतकर्‍यांपेक्षा व्यापारी, अडते यांनी खरेदी केलेले धान्य मोठय़ा प्रमाणात आहे. ते शेडमध्येच असल्याने नुकसान झाले नाही.
बहिरम यात्रेत उडाली तारांबळ
अचलपूरपासून काही अंतरावर असलेल्या बहिरम येथे सध्या बहिरमबुवाची यात्रा सुरू आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे उघड्यावर दुकाने थाटलेल्यांची मोठी तारांबळ उडाली. दुकानदारांना पावसापासून साहित्याचा बचाव करता आला नाही. परिणामी, खेळणीची दुकाने, हॉटेल, चहा-पान टपर्‍या चालवणार्‍या छोट्या-मोठय़ा व्यावसायिकांचे नुकसान झाले.