आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत्र्याला बसला हादरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पावसाच्या कहराने इतर पिके गारद झाल्यानंतर अतिवृष्टीचे परिणाम आता संत्रा बागांवरही दिसू लागले आहेत. बागांना बुरशीजन्य आजाराची लागण झाल्यामुळे जिल्ह्यात आंबिया बहाराची संत्री गळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

अंजनगावसुर्जी, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी आदी तालुक्यांमध्ये आंबिया बहाराचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यामुळे बागायत पट्ट्यात आर्थिक सुबत्ताही आली आहे. मृग बहारापेक्षा आंबिया बहार बागेच्या आयुष्यमानाच्या दृष्टीने फायदेशीर ठरत असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आंबियाच्या उत्पादनाकडे वळले. चारघड, पूर्णा, शहानूर प्रकल्पाच्या पाणी उपलब्धतेमुळे मोठ्या प्रमाणात संत्र्याची लागवड होत आहे. दरम्यान, जून महिन्यात पाऊस लांबल्यामुळे पेरण्यांना फटका बसला. त्यानंतरच्या मुसळधार पावसामुळेही पेरणी झालेल्या पिकांना फटका बसला. त्यापूर्वी, जानेवारी व मार्च महिन्यात अंजनगावसुर्जी, अचलपूर, मोर्शी, वरुड तालुक्यांना गारपिटीचा प्रचंड फटका बसल्यामुळे आंबिया व मृग बहाराचे प्रचंड नुकसान झाले होते. पाऊस लांबल्यामुळे मोर्शी व वरुड तालुक्यांत मृग बहाराची फूटही झाली नाही. ज्या शेतक-यांच्या बागा विहिरीच्या पाण्यावर फुटल्या, त्यांच्याही बागा पाऊस लांबल्यामुळे गळून गेल्या. अशा परिस्थितीत संत्रा उत्पादक पट्ट्यातील काही शेतकरी बचावले होते. आंबियाचा बहार चांगला असल्यामुळे व इतर ठिकाणी प्रचंड नुकसान असल्यामुळे आतापासूनच प्रती हजार संत्र्यांना दोन हजार रुपयांचा दर मिळत होता. त्यामुळे संत्रा तोडणीवर येईस्तोवर दर आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे या सर्व शेतक-यांच्या आशा संत्र्यावर होत्या; परंतु आता अतिवृष्टीमुळे बागांना बुरशीजन्य आजाराची लागण झाल्यामुळे बागांमधील 60 टक्क््यांच्या वर फळे गळून पडली आहेत.

अंजनगावसुर्जी, अचलपुरात झटका
परिसरात संत्र्यासोबत केळीचेही पीक घेतल्या जाते. मागील आठवड्यातील अतिवृष्टीमुळे कोट्यवधीची केळी भुईसपाट झाली. यातच केळीनंतर आता संत्र्याची गळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या परिसरातील शेतक-यांना दुहेरी नुकसान सोसावे लागत आहे.

कृषीकेंद्र चालक झाले डॉक्टर
शेतक-यांना माहिती देण्यासाठी कृषी विभाग व विद्यापीठाची यंत्रणा तोकडी पडत असल्यामुळे नेमकी काय उपाययोजना करावी, असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे. दरम्यान, स्थानिक कृषिकेंद्र चालकाच्या मार्गदर्शनातच फवारणी करण्यात येत असून, कृषिकेंद्र चालकच डॉक्टर झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केल्या आहेत.