आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संततधार पावसामुळे जनजीवन झाले ठप्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दोन दिवसांपासून सुरु झालेला संततधार पाऊस मंगळवारी तिसर्‍या दिवशीही सुरु राहिला. पावसामुळे जनजीवन ठप्प झाले असून नागरिकांची नियमित कामेही प्रभावित झालीत. जिल्हाभरात पडझडीची कोणतीही घटना झाली नसली तरी शिकस्त इमारतधारकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सलग तिसर्‍या दिवशीही सुरु राहिलेल्या पावसाचा सरकारी व निमसरकारी कार्यालयांसह शाळा-महाविद्यालयांतील उपस्थितीवर परिणाम झाला. आज बहुतेक कार्यालयांमध्ये तुरळक उपस्थिती होती. शाळा व महाविद्यालयांमध्येही विद्यार्थी-शिक्षकांची उणीव जाणवली. पावसाचा सर्वाधिक परिणाम बाजारओळींवर झाला. अत्यंत गरजू नागरिकच बाजारहाट करताना दिसून आले. दिवसभर पावसाची रिपरीप सुरु असल्यामुळे अनेकांनी सायंकाळी खरेदी केली. नोकरदार वर्गासाठी ही बाब फायदेशीर ठरली. दिवसभराचे कार्यालयीन कामकाज आटोपून घरी परतताना त्यांना ही कामे करता आली.

धान्य, किराणा, कापड, स्टेशनरी-कटलरी, भाजीपाला व फळफळावळांच्या दुकानांमध्ये दररोजसारखी गर्दी नव्हती. रस्त्याच्या कडेला दुकाने लावून बसणार्‍यांनीही स्वत:वर नियंत्रण ठेवले. त्यामुळे शहरभरांतील हॉकर्सची संख्याही दिवसभर रोडावली होती. सकाळी गल्ली-बोळात फिरणारे भाजी विक्रेतेही अभावानेच दिसून आले.

दीड महिन्यांपासून दडी
अमरावती जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारली होती. दुसरीकडे पावसाळ्याचे 45 दिवस संपायला आले तरी मान्सून सुरु न झाल्यामुळे अनेकांच्या चिंता वाढल्या होत्या. तीन दिवसांपासूनच्या पावसाने सर्वांना चिंतामुक्त केले.

नदी-नाल्यांचे प्रवाह नियमित
तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्हाभरातील नदी-नाल्यांचे प्रवाह नियमित होत असून पाण्याच्या पातळीतही वाढ होत आहे. पर्जन्यवृष्टी नसल्याने भर पावसाळ्यातसुद्धा नदी-नाले कोरडेच होते. त्यामुळे भूजल पातळीत घट होण्यासोबतच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवेल, अशी भीती निर्माण झाली होती.

कोणतेही नुकसान नाही
पावसाची रिपरीप सतत सुरु असली तरी पावसाशी संबंधित अपघाताची अद्याप कोणतीही घटना घडली नाही. पाऊस जेमतेमच सुरु झाला असल्याने नदी-नाले भरभरुन वाहण्याचा प्रश्नच नाही. परंतु तरीही नदीकाठच्या लोकांसह शिकस्त इमारतधारकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरेंद्र रामेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अमरावती.