आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा कहर, भिजलं शहर! शंभरावर झाडे कोसळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - तब्बल दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने जणू आभाळ फाटल्यागत परिस्थिती शहरात निर्माण झाली. यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्याच पावसाने महापालिकेची मात्र दाणादाण उडाली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे शहरात शंभरपेक्षा अधिक झाडे कोसळली असून, व्यापारी संकुल आणि अनेक भागांतील घरांमध्ये पाणी शिरले होते.

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने मंगळवारी (22 जुलै) रात्रीपासून रौद्र रूप धारण केले. जोरदार वार्‍यासह आलेल्या पावसामुळे महापालिका क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अमरावती व बडनेरा शहरांत अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका झाडांना बसला. पाण्याचा निचरा न झाल्याने व्यापारी संकुल तसेच अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. महापालिकेचे आणीबाणी कक्षातील पथकासह अधिकारीदेखील बुधवारी पहाटेपासूनच बचाव कार्यात सहभागी झाले. पावसामुळे विजेच्या तारांवर झाडे कोसळल्याने अनेक शासकीय कार्यालयांत विजेचा लपंडाव सुरू होता. शिवाय दुरुस्ती कार्यात पाण्याचा व्यत्यय सुरूच होता.

दोन महिन्यांनी मान्सूनच्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. सोमवारपासून आरंभ झालेल्या पावसाच्या तब्बल 404 मि.मी. एवढय़ा सरी बरसल्या. मोठय़ा प्रमाणात पाऊस बरसल्याने शहरातील नालेदेखील तुडुंब वाहले. अनेक भागांमध्ये नाल्यातील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाल्याने नागरिकांच्या घरांतदेखील पाणी शिरले. जोरदार पावसाचा फटका शहरातील विकास कामांनादेखील बसला. अतिवृष्टीच्या निधीतून दुरुस्ती करण्यात आलेले काही रस्ते पुन्हा खरडून गेले. 13 व्या वित्त आयोगातून होत असलेल्या राजापेठ - दस्तुरनगर रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे.