आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rain Lightning Casualty In National Disaster Response Force

वीज पडून झालेला मृत्यू केंद्रीय आपत्ती निवारण निधीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - वीज पडून झालेला मृत्यू केंद्रीय आपत्ती निवारण निधीत (एनडीआरएफ) समाविष्ट व्हावा, अशी तरतूद लवकरच केली जाणार आहे. यंत्रणेच्या एक्स्पेंडिचर विभागाचे सहसंचालक डॉ. पी.जी.एस. राव यांनी हे तथ्य मान्य केले आहे. दिल्ली बैठकीत तशी मांडणी करणार असल्याचेही त्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. विशेष असे, की राज्य शासनानेही असा प्रस्ताव यापूर्वीच पाठवला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे होणार्‍या नुकसानाची पाहणी करून पीडितांच्या नातेवाइकांना मदत देण्यासाठी शासनाने एनडीआरएफ ही यंत्रणा सज्ज केली आहे. मान्सूनच्या सुरुवातीलाच या यंत्रणेची ध्येय व उद्देश स्पष्ट करण्यात आले. त्यामध्ये पूरबळी, घरांची पडझड, शेतजमीन व पिकांचे नुकसान, सार्वजनिक इमारती आणि पायाभूत सुविधांचे नुकसान आदींसाठी किती मदत द्यावी, याचे परिमाण दिले आहेत. मात्र, वीज पडून झालेला मृत्यू हे नैसर्गिक संकट असतानाही मृतांच्या नातेवाइकांना मदत देण्याची कोणतीही तरतूद नाही.

या विरोधाभासी स्थितीमुळे सामान्य नागरिकांसह यंत्रणेचीही गोची झाली. दरम्यान, तीन महिन्यांतील पूरबळी व इतर मृतांना एनडीआरएफ आणि राज्य शासन अशी दुहेरी मदत देण्यात आली; परंतु वीज पडून मृत झालेल्यांच्या नातेवाइकांना मात्र एनडीआरएफचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे एका मृताच्या कुटुंबीयांना अडीच लाख, तर दुसर्‍या मृताच्या नातेवाइकांना राज्य शासनाची मदत असलेले केवळ एक लाख रुपयेच मिळाले. हे भीषण वास्तव माहीत झाल्यानंतर राव यांनी आगामी दिल्लीतील बैठकीत तशी शिफारस करण्याचे मान्य केले.कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही तसा प्रस्तावही केंद्राकडे पाठवला आहे.

एनडीआरएफचे तळ अमरावतीतही!
एनडीआरएफचे महाराष्ट्रातील तळ (बेस स्टेशन) पुण्यात आहे. त्यामुळे पूरस्थिती, अतिवृष्टी, वादळी पाऊस अशा स्थितीत अडकलेल्या नागरिकांना तत्काळ मदत करता येत नाही. पुण्याहून अमरावतीत पथक पोहोचायला तब्बल 12 तास लागतात. या पार्श्वभूमीवर जुजबी साहित्यासह एक तळ अमरावतीतही असावे, अशी जुनीच मागणी आहे. दिल्ली बैठकीत हाही मुद्दा मांडण्याचे राव यांनी मान्य केले.