आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rain News In Marathi, Suddenly Rain Issue At Amravati, Divya Marathi

गारपीटग्रस्त भागांत सर्वेक्षण सुरू; शेतकर्‍यांचे कोट्यवधींचे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागील आठवड्यात अकाली पाऊस, वादळ आणि गारपिटीने झालेल्या नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण करण्याचे काम महसूल विभागाने हाती घेतले आहे. या अस्मानी संकटामध्ये शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुका कृषी आणि महसूल विभागामार्फत सर्वेक्षण सुरू झाले असून, पन्नास टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्यांनाच नुकसानभरपाई (रब्बी पीक विमा) मिळण्याची शक्यता या दोन्ही विभागांकडून वर्तवली जात आहे. तालुक्यातील गहू, हरभरा, संत्रा आदी रब्बी पिके गारपिटीच्या तडाख्यात सापडलीत.
75 टक्के शेतकरी बागायती करणारे असून, सर्वेक्षणानंतर तत्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी शेतकर्‍यांची मागणी जोर धरत आहे.
टेंभुरखेडा परिसरातील शेतकरी करणार उपोषण : शेतकर्‍यांना हेक्टरी 30 हजार रुपयांची मदत करण्यात यावी; अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. टेंभुरखेडा परिसरातील दायवाडी, भेंमडी, गव्हाणकुंड, इसंब्री, बहादा येथील शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार राम लंके यांना यासंदर्भात निवेदन दिले. या वेळी अमोल कोहळे, सागर देशमुख, शशिभूषण उमेकर, मनोज माहुलकर, शंतनू उमेकर, जितेश पोटफोडे, कमलेश कुबडे, प्रदीप मुरुमकर आदी शेतकरी उपस्थित होते. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातीलखंडाळा, शिवणी खु., कणी मिर्झापूर, वेणी गणेशपूर, फुबगाव, पहुर, मंगरूळ चव्हाळा, सुलतानपूर, शेलू, वाघोडा आदी गावांच्या परिसराला या अस्मानी संकटाचा फटका बसत असून, अतोनात नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला. 18 घरांचे नुकसान झाले.
नांदगाव तालुक्याचा अहवाल केला सादर
नांदगाव तालुक्यात ज्यांचे 50 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले, असे 316 शेतकरी आणि 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, असेसुद्धा 316 शेतकरी आहेत. अस्मानी संकटाचा फटका बसलेल्या पिकांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे, त्यामध्ये हरभर्‍याचे 110 हेक्टरवर नुकसान झाले, गव्हाचे 46 हेक्टरवर, संत्र्यांचे चार हेक्टर आणि इतर 17 हेक्टरवरील अन्य पिकांचे, असे एकूण 177 हेक्टरवर तालुक्यात नुकसान झाले आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त झालेल्या नुकसानामध्ये 257 हेक्टरवर हरभर्‍याचे नुकसान झाले. गव्हाचे 86 हेक्टरवर, संत्र्याचे सात हेक्टर आणि इतर पिकांचे 41 हेक्टरवर नुकसान झाल्याचे जिल्हाधिकार्‍यांना पाठवलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये झालेल्या गारपिटीमुळे संत्र्यांचा असा सडा पडला.