आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘चिंब पावसानं रान झालं आबादानी..’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- झाड-वेलींना न्हाऊन काढणार्‍या शनिवारच्या (दि. 5) पावसाने सृष्टीतील जीव आनंदले आहेत. इवलेइवले तृण मातीतून डोकावू लागल्याने जमिनीच्या हिरव्या गाराला जणू सुरुवात झाली आहे. गावोगावी सुरू झालेल्या पेरण्या अन् मातीतून बाहेर आलेले किडे टिपण्यासाठी पक्ष्यांचे जमलेले थवे या आनंदोत्सवाचे दर्शन घडवत आहे.
आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या काही शेतकर्‍यांसाठी शनिवारचा पाऊस समाधानकारक ठरला. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पेरण्यांना सुरुवात झाली. शेतीच्या कामांना वेग आला आहे. तापमान कमी झाल्याने जमिनीतील लहान जीव, कीटक बाहेर येत आहेत. त्यामुळे शहर परिसरातील जंगलात मुक्तपणे बागडणारी पाखरं शेताच्या बांधांवर दिसताहेत. नागरी जनजीवन आणि बाजारपेठेतही या पावसाने नवचैतन्य संचारले असून बियाणे, खते खरेदीसाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे.
छत्र्या, रेनकोट, वाहनांसाठी कव्हर, ताडपत्री विक्री करणार्‍या फेरीवाल्यांनी शहरात ठिकठिकाणी दुकाने थाटली आहेत. शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक या पावसाने काही अंशी सुखावले आहेत. पावसाअभावी सुकणारी कपाशीची रोपे पहिल्याच पावसाने टवटवीत झाल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांनी दिली.