आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray News In Marathi, MNS, Yavatmal, Lok Sabha Election

राज यांचा ‘मारून मरा’चा सल्ला वादाच्या भोव-यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी यवतमाळ जिल्हय़ात शेतकर्‍यांना ‘मारून मरा’चा दिलेला सल्ला वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी आता राज यांच्या भाषणाची सीडी लीगल सेलकडे रवाना केली आहे. या भाषणात आक्षेपार्ह वक्तव्य आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल तसेच पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मंगळवारी, 8 एप्रिलला पत्रकार परिषदेत दिली.

यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजू पाटील राजे यांच्या प्रचारासाठी 7 एप्रिल रोजी यवतमाळ येथील पोस्टल ग्राउंड येथे राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेत यवतमाळ जिल्हय़ातील आत्महत्यांबाबत बोलताना राज यांनी, ‘शेतकर्‍यांना ज्यांच्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली त्यांना मारून मरा’ असा सल्ला दिला होता. शेतकर्‍यांना जीव घेण्याचा दिलेला सल्ला जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांना वादग्रस्त वाटल्याने त्यांनी राज यांच्या भाषणाची सीडी बोलावून घेतली आहे. या सीडीमधील मजकूर वादग्रस्त वाटल्याने त्यांनी ही सीडी आता लीगल सेलकडे रवाना केली आहे. या सेलचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारावर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.