आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajapeth Railway Crossing Development Issue Amravati

राजापेठ आरओबीला अद्यापही सापडेना मुहूर्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर होणारी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाच्या निर्मितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी नागरिकांची इच्छा आहे. या बहुप्रतीक्षित पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात महापालिकेला फक्त 10 लाख रुपये मिळाले आहेत. रखडलेल्या उड्डाणपुलासंदर्भातील लोकांच्या संतप्त भावना आणि होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून येत्या तीन महिन्यांत या पुलाच्या कामाला शुभारंभ होण्याची शक्यता आहे.

राजापेठ चौक ते दस्तुरनगर हा भाग जोडणार्‍या या मार्गावर राजापेठ रेल्वे क्रॉसिंग आहे. 24 तासांत हे फाटक तब्बल 36 वेळा बंद होते व उघडते. या दरम्यान वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. या मार्गावर रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात यावा, यासाठी अनेकदा आंदोलन झाले. अखेर उड्डाणपुलासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यापैकी 10 लाख रुपये महापालिकेला मिळाले आहेत. निविदा प्रक्रियेसाठी किमान एक महिना आणि प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी किमान तीन महिने लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी निवडणुकीत उड्डाणपुलाचा मुद्दा सत्ताधार्‍यांना नुकसानदायक ठरू नये म्हणून ऐन निवडणुकीच्या तोंडावर या पुलाच्या बांधकामाला सुरुवात होऊ शकते.

श्रेयासाठी चढाओढ
महापालिकेची निवडणूक जवळ आल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी राजापेठ उड्डाणपुलासाठी आपणच निधी खेचून आणल्याचा प्रचार चालवला होता. रेल्वे क्रॉसिंगवर प्रचंड मोठे फलक लावून र्शेय लाटण्याची चढाओढही सुरू झाली होती. परंतु, त्यानंतर हा मुद्दा मागे पडला. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा श्रेयाच्या राजकारणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

बांधकामात दिरंगाईची भीती
उड्डाणपुलाचे काम करून घेण्यासाठी समन्वयाची जबाबदारी महापालिकेकडे सोपवण्यात आली आहे. मध्य रेल्वेने पुलाचे काम सुरू करण्याबाबत केव्हाच हिरवा कंदील दिला आहे. रेल्वे कायद्यानुसार, रुळांवरील कोणतेही बांधकाम करण्याचा हक्क केवळ रेल्वे विभागाला आहे. मध्य रेल्वे रुळांवर तातडीने तितके बांधकाम करायला तयार आहे. परंतु, रेल्वेच्या हिस्स्याचे रुळांवर बांधकाम एकदा केले, की तो मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचा अधिकार रेल्वेला आहे. अमरावती-बडनेरा मार्गावरील नरखेड क्रॉसिंगवर रेल्वेकडून बांधकाम पूर्ण झाले आहे. राज्य सरकारकडूनच कामात ढिलाई सुरू आहे. असाच प्रकार राजापेठ क्रॉसिंगबाबतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

..तर मार्ग होऊ शकतो बंद
रेल्वेने त्यांच्या हिस्स्याचे बांधकाम केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक रेल्वे तातडीने बंद करू शकेल. तसे झाल्यास राजापेठचा मार्ग वाहतुकीसाठी बंद होईल. रेल्वेच्या कामाच्या तुलनेत राज्य शासनाच्या बांधकाम विभागाचा वेग कासवगतीचा आहे. त्यामुळे रेल्वेने आपले काम पूर्ण केल्यानंतर हा मार्ग केव्हाही बंद होऊ शकतो, अशी भीती अधिकार्‍यांना आहे.