आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajendra Gavai News In Marathi, Nationalist Congress, Navneet Rana, RPI

आता राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून लढणार नाही ,राजेंद्र गवई यांचे अमरावतीत जाहीर वक्तव्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - नवनीत राणा यांचे जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्यास, राष्ट्रवादी कॉँग्रेसने तिकीट दिले तरी त्यांच्याकडून निवडणूक लढणार नसल्याचा निर्धार रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी अमरावती येथे पक्षसर्मथकांच्या जाहीर मेळाव्यात व्यक्त केला.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाउन हॉलमध्ये मंगळवारी प्रमुख कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्त्यांच्या भरगच्च उपस्थितीत रिपाइंने प्रचाराचे नारळ फोडले. त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण टाउन हॉल पूर्ण भरला होता. रिपाइंच्या स्वाभिमान आणि अस्तित्वाच्या लढाईस आता सुरुवात झाली असून, बाबासाहेबांचा सच्चा शिपाई म्हणून मी आता राष्ट्रवादीचे तिकीट घेणार नाही, असेही गवई यांनी स्पष्ट केले. लोकसभेसाठी रिपाइंच्या पाच उमेदवारांची नावेही या वेळी घोषित करण्यात आली. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याबद्दल डॉ. गवई यांनी पक्षावर व पक्षनेतृत्वावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांनी ‘घड्याळ’वर निवडणूक लढवण्याची अट घातली होती. त्यांना गवई चालतो, पण रिपाइं चालत नाही. मी रिपाइंमध्ये जन्मलो आणि रिपाइंतच मरणार, असे त्यांनी स्पष्ट केले. रिपाइं हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष असून, आता शिस्तबद्ध पद्धतीने निवडणूक लढायची आहे.


आंबेडकरी जनतेच्या मतांचे विभाजन होऊ देऊ नका. आता अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. तेव्हा एकजूट व्हा, कामाला लागा. डोळ्यांत तेल घालून काम करा. रिपांइला यश द्या, दादासाहेब गवई यांना जिंकवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विजयी करा, असे भावनिक आवाहन गवई यांनी केले. रिपाइंची तिकीट हवी असेल, तर पक्षासाठी काम करा, रिपाइंत प्रवेश करा, कार्य दाखवा. हा धनाढय़ांचा पक्ष नसून सर्वसामान्यांचा पक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले.


251 किलोंची माळ : मेळाव्यादरम्यान गुलाब व शेवंतीच्या फुलांनी तयार केलेली 251 किलोंची माळ घालून डॉ. गवई यांचे स्वागत करण्यात आले.


मेळाव्याला रामेश्वर अभ्यंकर, प्रताप अभ्यंकर, भाऊ ढंगारे, भय्यासाहेब गवई, मस्तान कुरेशी, नगरसेवक भूषण बनसोड, पुरुषोत्तम भागवत, मिलिंद तायडे, प्रताप अभ्यंकर, बळवंत वानखडे, भन्ते प्रज्ञाबोधी, भन्ते सदानंद, कल्लू महाराज, वर्षा गवई, उमा वानखडे यांच्यासह रिपाइंचे जिल्ह्यातून आलेले शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक भूषण बनसोड यांनी केले. संचालन अजय श्रुंगारे यांनी केले.


पाच उमेदवारांची घोषणा
अमरावती - डॉ. राजेंद्र गवई
चंद्रपूर - अशोक खंडारे
वर्धा - डॉ. मोरेश्वर नगाडे
मुंबई उत्तर-पूर्व - गुलाम हुसेन
गडचिरोली - अँड. प्रभाकर गडवा