आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकुमार व्हटकर नवीन पोलिस आयुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावतीचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून राजकुमार व्हटकर यांची शनिवारी नियुक्ती झाली आहे. सध्या ते पोलिस महासंचालक कार्यालयात नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. व्हटकर यांच्या आयुक्त पदाच्या नियुक्तीमुळे अमरावती पोलिस आयुक्तपदासाठी मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा आता संपुष्ठात आली आहे. व्हटकर लवकरच अमरावतीत रुजू होणार असल्याचे 'दै. दिव्य मराठी'शी बोलताना त्यांनी सांगितले.
राजकुमार व्हटकर हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून, १९९८ च्या तुकडीचे थेट आयपीएस आहेत. पोलिस सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी परिविक्षाधीन कालावधी ठाणे येथे पूर्ण केला. त्यानंतर एएसपी चंद्रपूर येथे अडीच वर्ष, पुणे पेालिस उपायुक्त, रायगड पोलिस अधीक्षक, औंरगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक, मुंबई पोलिस उपायुक्त आणि त्यानंतर केन्द्रीय अन्वेषण विभागातील एसीबीला डीआयजी म्हणून मुंबईला कार्यरत होते. मागील तीन वर्षांनंतर ते नुकतेच महाराष्ट्र पोलिस दलात परतले असून जून २०१५ रोजी ते पोलिस महासंचालक कार्यालयात रुजू झाले होते. सध्या ते नवीन नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. शनिवारी त्यांची अमरावती पेालिस आयुक्त म्हणून नियुक्त झाली आहे. दरम्यान, २०१५ चा राष्ट्रपती उत्कृष्ठ पोलिस सेवा गुणवत्ता पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. सुरेशकुमार मेकला यांची १७ एप्रिलला अमरावती पोलिस आयुक्त पदावरून पुणे एसआरपीएफ आयजी म्हणून पदोन्नतीने बदली झाली. त्यानंतर अमरावती पोलिस आयुक्त म्हणून पुणे आयुक्तालयात गुन्हे शाखेचे अतिरीक्त पोलिस आयुक्त असलेले शहाजी सोळुंके यांची बदली झाली होती. मात्र ते अमरावतीला रुजू झाले नाही. त्यामुळे उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्याकडे अतिरीक्त प्रभार देण्यात आला. मात्र ते आजारी असल्यामुळे आठ दिवस पुणे एसआरपीएफचे आयजी अमरावतीचे माजी पोलिस आयुक्त डॉ. मेकला यांच्याकडे अतिरीक्त प्रभार होता.
चार दिवसांपुर्वी डॉ. मेकला यांच्याकडील प्रभार पुन्हा उपायुक्त घार्गे यांच्याकडे देण्यात आला होता. आयपीएस व्हटकरांच्या रुपाने अमरावती शहर पोलिस दलाला नवीन 'राजकुमार' मिळाले आहे. मागील काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून,पोलिस तपास मंदावल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर व्हटकर यांच्या नियुक्तीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
पुढच्या आठवड्यात स्वीकारणार पदभार
शनिवारी व्हटकर यांची अमरावती पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर 'दै. दिव्य मराठी'ने राजकुमार व्हटकर यांच्यासोबत संपर्क साधला असता, पुढील आठवड्यात आपण अमरावतीला येवून नवीन पदाची जबाबदारी स्विकारणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता अमरावतीला दीड महिन्यानंतर पूर्णवेळ पोलिस आयुक्त मिळणार असून,राजकुमार व्हटकर यांच्या कार्यशैलीबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.