आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ralway Station Security Issue At Amracati, Divya Marathi

असुरक्षिततेचे ‘मॉडेल’ स्थानक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- चेन्नईतील रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोटानंतर रेल्वे स्थानकांवरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गाजावाजा व कोट्यवधीचा खर्च करत साकारण्यात आलेले शहरातील रेल्वे स्थानक मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेपासून कोसों दूर आहे. देशातील असुरक्षित रेल्वे स्थानकांचे ते ‘मॉडेल’ ठरले आहे. दरदिवशी हजारो प्रवासी या ठिकाणाहून ये-जा करतात, मात्र या मॉडेल स्टेशनच्या सुरक्षेच्या पुरत्या चिंधड्या उडाल्या असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या चमूने केलेल्या पाहणीत पुढे आले आहे.
चेन्नईतील स्फोटानंतर ‘दिव्य मराठी’ चमूने मॉडेल रेल्वे स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. रेल्वे स्थानक भटक्यांचे विर्शांतिस्थान बनले आहे. स्थानकावर एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. मेटल डिटेक्टरबाबत कर्मचार्‍यांना माहितीही नाही. लगेजची तपासणी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे स्कॅनिंग मशिनही स्थानकावर नाही. धक्कादायक बाब म्हणजे स्टेशनच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार्‍या जीआरपीचा केवळ एकच पोलिस कर्मचारी रेल्वे स्थानकावर हजर असतो, तर गर्दीच्या वेळी दोन किंवा तीन पोलिसच तैनात असतात. रात्रीसुद्धा हीच परिस्थिती असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

मॉडेल रेल्वे स्टेशनला चार फलाट आहेत. सध्या हे चारही फलाट वापरात आहेत. मात्र, कॉटन मार्केटच्या दिशेने कोणीही, कधीही, कसेही रेल्वे स्टेशनवर प्रवेश करू शकतो. कारण या बाजूने संरक्षक भिंत नाही. रायली प्लॉटकडून असलेले प्रवेशद्वार उघडे असते. लांब पल्ल्यावर चालणार्‍या रेल्वेगाड्या फलाटावर दिवसभर उभ्या असतात. अशावेळी त्या गाड्यांना सुरक्षा देणे आवश्यक आहे. मात्र, सर्व बाजूंनी उघडे असलेले मॉडेल स्टेशन ‘रामभरोसे’ दिसून येते.

रेल्वे स्थानकावर नव्याने इमारत बांधण्यात आली आहे. पहिल्या माळ्यावर असलेल्या खोल्या बंद असल्या, तरी स्लॅबवर मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे. याकडे रेल्वे प्रशासन किंवा जीआरपी पोलिसांचे लक्ष नाही. अशा बिकट स्थितीत असलेल्या मॉडेल रेल्वे स्थानकावर कधीही घातपाताची शक्यता नाकारता येत नाही.
लांब पल्ल्यावर चालणार्‍या रेल्वे
रायली प्लॉटकडून फलाट क्रमांक चारवर दुचाकी उभी असल्याचे निदर्शनास आले. यासोबतच रेल्वे स्टेशनला वाहनतळासाठी प्रशस्त जागा आहे. मात्र, अद्याप वाहनतळाचा कंत्राट कोणीही न घेतल्यामुळे वाहने वाट्टेल त्या ठिकाणी उभी असतात. मुख्य प्रवेशद्वारावरून स्टेशनवर प्रवेश करण्यासाठी अंदाजे 50 फूट रुंद जागा आहे; मात्र वाहने अशाप्रकारे उभी केलेली असतात, की 50 फुटांपैकी 45 फूट जागा वाहनांनीच व्यापली जाते.
मॉडेल रेल्वे स्थानकावर केवळ एक पोलिस कर्मचारी दिसून येतो. हजारो प्रवासी येथून प्रवास करतात. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाय-योजना येथे दिसून येत नाहीत. इतकेच नाही तर, रेल्वे स्थानकाच्या कार्यालयीन इमारतीच्या छतावर मोठय़ा प्रमाणावर मद्यांच्या बाटल्यांचा खच दिसून येतो.
रिपोर्ट
सोमवार : इंटरसिटी एक्स्प्रेस, तिरुपती एक्स, सुरत, अमरावती-नागपूर पॅसेंजर, मुंबई एक्स, अमरावती-पुणे एक्स., जबलपूर एक्स्प्रेस
मंगळवार : इंटरसिटी एक्स, अमरावती-नागपूर पॅसेंजर, मुंबई एक्स्प्रेस जबलपूर एक्स्प्रेस
बुधवार : इंटरसिटी एक्स, अमरावती-नागपूर पॅसेंजर, मुंबई एक्स, जबलपूर एक्स्प्रेस
गुरुवार : इंटरसिटी एक्स, तिरुपती एक्स, अमरावती-नागपूर पॅसेंजर, मुंबई एक्स, जबलपूर एक्स.
शुक्रवार : इंटरसिटी एक्स, सुरत, अमरावती-नागपूर पॅसेंजर, मुंबई एक्स, जबलपूर एक्स.
शनिवार : सुरत, अमरावती-नागपूर पॅसेंजर, मुंबई एक्स, अमरावती-पुणे एक्स. जबलपूर एक्स.
रविवार : अमरावती-नागपूर पॅसेंजर, मुंबई एक्स्प्रेस, जबलपूर एक्स्प्रेस.
सीसीटीव्हीबाबत प्रस्ताव पाठवलाय
मॉडेल स्टेशनवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरा लावणे आवश्यक आहे. तसा प्रस्ताव आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे. तसेच वाहनतळाचा कंत्राट दोनवेळा निविदा काढून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे वाहने अस्ताव्यस्तरीत्या उभी आहेत. व्ही. टी. गोंडाणे, उपस्टेशन प्रबंधक, मॉडेल रेल्वे स्टेशन.
अधिकाधिक चांगली सुरक्षा देण्याचा प्रयत्न
आमच्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे; मात्र आम्ही प्रवाशांना उत्तम सुरक्षा देण्याचा प्रयत्न करतो. दोन किंवा तीन कर्मचारी दिवसा आणि रात्री कार्यरत असतात. एकूण पाच कर्मचारी मॉडेल स्टेशनसाठी कार्यरत आहेत. ज्ञानेश्वर नालट, उपनिरीक्षक, जीआरपी.