आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत साकारतेय थ्री इडियट्सच्या 'रँचो'ची संशोधन शाळा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - साठीनंतर निवृत्त झाले, तरी स्वस्थ न बसता, काही आगळंवेगळं करण्याचा अमरावतीच्या डॉ. व्ही. टी. इंगोले यांना ध्यास आहे. अभ्यासू, संशोधक तसेच तरुणांना संशोधनासाठी प्रोत्साहन मिळावे, दोघांनाही व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने डॉ. इंगोले यांच्या पुढाकारातून मार्डी मार्गावरील श्रीसंत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलपासून सुमारे एक किलोमीटरवर ‘ग्रीन सर्कल’ नावाने ही आगळीवेगळी संशोधन शाळा सुरू होत आहे. २१ डिसेंबरला उद्घाटनानंतर ही शाळा सर्वांसाठी खुली असेल.

डॉ. इंगोले यांच्यासोबत बंधू व सेवानिवृत्त अधिकारी विद्याधर इंगोले यांचाही शाळेच्या उभारणीत मोठा वाटा आहे. येथे विज्ञानासोबतच कलेची जोपासना केली जाणार आहे. सेंद्रिय शेती, अत्याधुनिक शेतीच्या विषयावर इंगोले यांचे बंधू प्रयोग करणार आहेत.निसर्गावरच चालेल शाळा : सोलर सिस्टिम, पवनचक्की, सोलर वॉटर हिटर, प्रदूषण टाळण्यासाठी व प्लास्टिक पिशव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पॅराबोलिक सोलर हिटर, पाणी शुद्ध करण्यासाठी सिवेज वॉटर ट्रीटमेंट, डोंगरातील व छतावरील पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेततळे, गांडूळ खतनिर्मिती व रोटेटिंग प्रसाधनगृह अशा सुविधा येथे असतील. नैसर्गिक साधनांचा जास्तीत जास्त वापर करता यावा, अशा पद्धतीने शाळेची रचना आहे.
पवनचक्क्यांच्या माध्यमातून दररोज ५०० युनिटची वायू ऊर्जाही तयार करता येणार आहे. याशिवाय दर महिन्याला ५००, तर दर दिवसाला १८ युनिट वीज तयार करता येणार आहे. सौरऊर्जेचा वापर करूनही विद्युतीकरण करण्यात आले आहे.

ग्रीसपासून प्रेरणा
सुमारे १० वर्षांपासूनच संशोधन सुरू असल्याचे डॉ. इंगोले यांनी सांगितले. विज्ञासोबतच नेचर फोटोग्राफीची त्यांना आवड आहे. ग्रीसमधील अशाच एका शाळेपासून प्रेरणा घेत अमरावतीत ग्रीन सर्कलची निर्मिती केल्याचे ते म्हणाले. संधोधन करणा-या शास्त्रज्ञांसाठी निवास, भोजन आदी सर्वच व्यवस्था येथे असेल.

आगळेवेगळे ग्रीन सर्कल : कला व विज्ञानाची आवड असणा-या विशीतील तरुणांपासून साठी ओलांडलेल्या व्यक्तींसाठी ग्रीन सर्कल हे योग्य ठिकाण असेल. काही तरी वेगळे निर्माण करून त्याचा समाजासाठी कसा उपयोग होईल, यासाठी ग्रीन सर्कलमध्ये प्रयोगशीलतेला वाव असेल. संशोधन व अभ्यासासाठी १५ सेल्फ कंटेंड स्टुडिओ, मध्यभागी ५० व्यासाचा २५ किलो वजनी ग्रीन डोम, २०० ची क्षमता असलेला सेमिनार हॉल, २० ची क्षमता असलेला योग हॉल, ग्रंथालय, वायफाय, दुर्बीण, मीटर, ऑस्सिलोस्कोप, सर्किट डिझाइन आदी संशोधनासाठी उपयोगी पडणारे सर्वच साहित्य या ठिकाणी उपलब्ध असेल. याशिवाय डोंगराळ प्रदेशाचा आभास व्हावा यासाठी शाळेची रचनाही करण्यात आली आहे.

डॉ. इंगोलेंबद्दल थोडक्यात..
स्वत:च्या नावावर २२ पेटंट व इंडस्ट्रीमध्ये जवळपास ४० विविध प्रॉडक्ट डिझाइन केलेले डॉ. इंगोले अमरावती शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या पहिल्या बॅचमधील पदवीधर आहेत. नागपूरच्या व्हीएनआयटीमधून त्यांनी एम. टेक. १९९८ मध्ये सॉलिड स्टेट डिव्हाइसमध्ये आचार्य पदवी. लंडनच्या क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीच्या मुंबई कार्यालयात चीफ डिझाइन इंजिनिअर म्हणून त्यांनी काम केले. प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, आयईईई, आयईटीई व आयईटीईचे फाउंडर मेंबर अशी विविध उच्चपदे त्यांनी भूषवली आहेत. सध्या डॉ. इंगोले हे गोडे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक आहेत. राज्यातील दुर्गम भाग पिंजून काढत त्यांनी ‘अरण्यगर्भ’ हे पुस्तक लिहिले आहे.