आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दोन चमू येणार शहरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- राष्ट्रवादी कॉँग्रेसने राज्यातील 22 लोकसभा मतदारसंघांसाठी प्रभारींची नेमणूक केल्यानंतर अमरावती मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची, याबाबत चाचपणी सुरू आहे.अमरावती मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने महायुतीच्या उमेदवारासोबत राष्ट्रवादीची लढत होणार आहे. परिणामी, राष्ट्रवादीकडे तिकीट मागण्यास इच्छुक संभाव्य उमेदवारांमधून सक्षम उमेदवार शोधण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन विशेष चमू पुढील आठवड्यात अमरावतीत येत आहेत.

हे दोन चमू जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सरकारी कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, विश्लेषकांच्या भेटी घेऊन मते-मतांतरे जाणून घेणार आहेत. निवडणूक समीकरणाचा आढावा हे चमू घेतील. चाचपणी केल्यानंतर विस्तृत अहवाल राष्ट्रवादीकडे सोपवण्यात येईल. या अहवालाच्या आधारावरच लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस शिक्कामोर्तब करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आगामी निवडणुकीत हमखास विजयर्शी खेचून आणणार्‍या उमेदवारावर राष्ट्रवादी काँग्रेसची नजर आहे. त्यामुळे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असणार्‍या उमेदवारांनाच प्राधान्य देण्याचा राष्ट्रवादी गांभीर्याने विचार करत असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत अमरावती मतदारसंघावर काँग्रेसने दावा केल्यामुळे पेच निर्माण झालेला आहे. त्यातच आघाडीचा पारंपरिक सहकारी पक्ष असलेल्या रिपाइंने (गवई गट) अद्यापही घड्याळ चिन्ह निवडणूक लढण्यास संमती दर्शविली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने अमरावती मतदारसंघात युद्धस्तरावर उमेदवार चाचपणीची माहिम हाती घेतली आहे. येत्या आठ आणि नऊ फेब्रुवारीला जागावाटपासाठी आघाडीची बैठक होणार आहे.

रिपाइं-राष्ट्रवादी आघाडीचे काय?
मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या तिन्ही बैठकींमध्ये अमरावतीबाबत समाधानकारक तोडगा निघाला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत अमरावती मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. आघाडीचा परंपरागत सहकारी पक्ष रिपाइंला (गवई गट) ही जागा सोडण्याची प्रथा दोन्ही पक्षांनी पाळली आहे. मात्र, 2014 च्या निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढणार्‍या उमेदवाराने ‘घड्याळ’ चिन्हावरच निवडणूक लढवावी, अशी आग्रही भूमिका पक्षाने घेतल्याने सहकारी पक्ष असलेल्या रिपाइंसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. गवई गटाला एवढय़ा सहजासहजी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात येणार नाही, अशी रिपब्लिकन कार्यकर्त्यांचीही धारणा आहे.